…तर कर्नाटकातील भाजप सरकार कोसळणार?

…तर कर्नाटकातील भाजप सरकार कोसळणार?

बंगळुरु – कर्नाटक विधानसभेच्या 15  मतदारसंघात आज पोटनिवडणूक पार पडत आहे. गोकाक, अथणी, कागवाड, शिवाजीनगर, यशवंतपूर, महालक्ष्मी लेआउट ,के .आर. पूरम, होसकोटे, चिक्कबळळापूर, विजयनगर, हिरेकेरुर, राणीबेन्नूर, हुनसूर,  यल्लापूर या मतदारसंघात आज मतदान होत आहे. या 15 जागांसाठी 165 उमेदवार मैदानात उतरले आहेत.महत्त्वाचं म्हणजे या 15 पैकी 8 मतदारसंघात भाजपला विजय मिळवणे गरजेचे आहे. तसे न झाल्यास कर्नाटकातील येडीयुरप्पांच्या नेतृत्त्वातील भाजप सरकार कोसळण्याची शक्यता आहे. जर असं झालं तर कर्नाटकत पुन्हा काँग्रेस आणि जेडीएस सत्ता स्थापनेचा दावा करु शकते. त्यामुळे कर्नाटकातील राजकीय हालचालींकडे लक्ष लागलं आहे.

या पोटनिवडणुकीसाठी बेळगाव जिल्ह्यातील तीन मतदारसंघात मतदान होत आहे . गोकाक,कागवड आणि अथणी या तीन मतदारसंघात मतदान होत आहे. यासाठी 771 मतदान केंद्राची स्थापना करण्यात आली असून 6 लाख 25 हजार 548 मतदान हक्क बजावणार आहेत. गोकाकमध्ये 288, कागवाडमध्ये  231 आणि अथणी मतदारसंघात 260 मतदान केंद्र आहेत.

दरम्यान काँग्रेस- जेडीएसच्या 14 बंडखोर आमदारांचे जुलै 2019 मध्ये सभापती रमेश कुमार यांनी
सदस्यत्व रद्द केले होते. त्यापूर्वी तिघांना निलंबित करण्यात आलं होतं. महत्त्वाचं म्हणजे विधानसभा अध्यक्षांनी 17 जणांना अपात्र ठरवत निवडणूक लढण्यास मज्जाव केला होता. परंतु सर्वोच्च न्यायालयाने गेल्या महिन्यात निकाल देत या 17 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय कायम ठेवला. हे आमदार पुन्हा निवडणूक लढवू शकतील असं नमूद केलं. त्यामुळे ते आमदारही आता निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत.

विशेष म्हणजे या 15 जागांवर भाजपने जे काँग्रेस-जेडीएसचे आमदार अपात्र ठरले होते, त्यांना आपल्याकडे खेचून घेत उमेदवारी दिली आहे. मात्र काँग्रेस-जेडीएसची युती तुटल्याने 15 फुटीर आमदारांना पराभूत करण्याचा चंग दोन्ही पक्षांनी बांधला आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोण जिंकणार याबाबतचं चित्र निकालानंतरच ल्पष्ट होणार आहे.

COMMENTS