मनसेच्या इंजिनचे डब्बे अस्ताव्यस्थ

मनसेच्या इंजिनचे डब्बे अस्ताव्यस्थ

ठाणे : कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेचे संस्थापक सदस्य व प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांच्या शिवसेना प्रवेशाच्या दुसऱ्याच दिवशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेतील मनसेचे माजी विरोधी पक्षनेते मंदार हळबे यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर मनसेला खिंडार पडले आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत मनसेचे माजी विरोधी पक्षनेते मंदार हळबे यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. मंदार हळबे हे कल्याण डोंबिवली महापालिकेतील मनसेचे विद्यमान गटनेते आहेत. त्यांनी केडीएमसीमध्ये विरोधी पक्षनेतेपदही भूषवलं आहे. दहा वर्षांपासून ते नगरसेवक आहेत. कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना-भाजप मंदार हळबे यांच्या संपर्क साधत असल्याचं बोललं जातं. त्यामुळे मंदार हळबेंना तातडीने ‘कृष्णकुंज’वर पाचारण करण्यात आलं होतं. परंतु हळबेंनी भाजप प्रवेश केल्याचं वृत्त धडकले.

राजेश कदम आणि मंदार हळबे यांच्या पक्षांतरानंतर मनसे नेत्यांमध्ये अस्वस्थतेचं वातावरण पसरल्याचं दिसत आहे. कल्याण डोंबिवलीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला गळती लागल्यानंतर पक्षाच्या एकमेव आमदाराने कृष्णकुंजवर धाव घेतली. राजू पाटील यांनी राज ठाकरे यांची भेट घेत चर्चा केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांच्यासह डोंबिवलीतील असंख्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. राजेश कदम हे ना आमदार आहेत, ना नगरसेवक, तरीही थेट मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या वर्षावर राजेश कदम यांचा पक्षप्रवेश झाल्याने, राजेश कदम यांची कल्याण डोंबिवलीत किती ताकद असू शकते, याचा अंदाज बांधता येईल. साहजिकच राजेश कदम यांच्या शिवसेना प्रवेशाने मनसेला मोठा फटका बसणार आहे.

COMMENTS