अखेर एकनाथ खडसेंचं ठरलं, गुप्त भेटीनंतर भाजपचं कमळ हटवलं?

अखेर एकनाथ खडसेंचं ठरलं, गुप्त भेटीनंतर भाजपचं कमळ हटवलं?

नागपूर – भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे अखेर पक्ष सोडणार असल्याची शक्यता बळावली आहे. एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची गुप्त भेट घेतली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.शरद पवार आणि एकनाथ खडसे यांची अज्ञातस्थळी भेट झाल्याची माहिती आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल अर्धा तास चर्चा झाली असून पवारांच्या भेटीनंतर खडसे देहरादूनला रवाना झाले आहेत.
विशेष म्हणजे जळगावातील मुक्ताईनगरमधील एकनाथ खडसेंच्या संपर्क कार्यालयावरील भाजपचं चिन्ह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो असलेले फलक काढल्याचंही समोर आलं आहे. त्यामुळे खडसे भाजपला रामराम ठोकण्याची शक्यता बळावली आहे.

दरम्यान काल एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा फेटाळली होती. आपण कोणाचीही भेट घेतली नसल्याचे खडसे म्हणाले होते. या सर्व अफवा आहेत. विधानभवानात माझी काही कामं असतात, मी मुख्यमंत्र्यांना भेटेल, शरद पवार आले तर त्यांना भेटेल आणि कोणी भेटायचं असेल तर त्यांना देखील भेटेल. मात्र याचा तुम्ही वेगळा अर्थ काढत आहात, कोणत्याही प्रकारे पक्ष बदलण्याचा आज विषय नाही असंही खडसे यांनी म्हटलं होतं.

दरम्यान काही दिवसांपूर्वीच एकनाथ खडसे यांनी पक्ष सोडण्याचे संकेत दिले होते. त्यामुळे ते राष्ट्रवादीत जाणार असल्याची चर्चा आहे. ते नागपूर येथे शरद पवार यांनाच भेटण्यासाठी गेले असल्याची चर्चा होती. परंतु आपण शरद पवारांची भेट घेतली नसल्याचं त्यांनी म्हटलं. तसेच माझं मन वळवण्याचा प्रश्नचं येत नाही, कारण मी काही कोणता निर्णय घेतलेला नाही. जर निर्णय घेतला असता तर वरिष्ठांना मन वळवण्याचा प्रसंग आला असता. परंतु, माझा वरिष्ठांशी कायम संपर्क असतो. मात्र असा कोणताही विषय नसल्याने वरिष्ठांनी माझं मन वळवण्याचा आजतरी संबंध नसल्याचं खडसे काल सकाळी म्हणाले होते.

परंतु काल रात्री मात्र खडसे यांनी पवारांसोबत गुप्त बैठक घेतली असल्याची माहिती आहे. त्यामुळे खडसे राष्ट्रवादीत जाणार असल्याच्या चर्चांना पुन्हा उधाण आलं आहे.

COMMENTS