कोल्हापूर काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी ‘या’ नेत्याची नियुक्ती!

कोल्हापूर काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी ‘या’ नेत्याची नियुक्ती!

कोल्हापूर – ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कोल्हापूरचे माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर जिल्हाध्यक्ष पद रिक्त झाले होते. या पदावर अखेर आमदार सतेज पाटील यांची नियुक्ती केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सतेज पाटील यांची निवड केली आहे. कोल्हापूर काँग्रेस जिल्हाध्यक्षपदासाठी माजी खासदार जयवंतराव आवळे व गुलाबराव घोरपडे यांनी फिल्डिंग लावली होती. परंतु जिल्ह्यातील पक्षाची स्थिती पाहता सतेज पाटील यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

दरम्यान एकेकाळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून कोल्हापूर जिल्ह्याची ओळख होती. परंतु सध्या दोन्ही पक्षांची जिल्ह्यात बिकट अवस्था आहे. भाजप-शिवसेना युतीने हा जिल्हा काबीज केला आहे. मागील विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष ऐकही आमदार जिल्ह्यातून निवडून आणू शकला नाही. त्यामुळे आता जिल्ह्यात पक्षाला बळ देण्याचं आव्हान सतेज पाटील यांच्यापुढे आहे.

दरम्यान दोन दिवसांपूर्वी काँग्रेसचे माजी खासदार व माजी उद्योग राज्य मंत्री कलाप्पा आवाडे, त्यांचे सुपुत्र व कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष , माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे आणि त्यांचे चिरंजीव व जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली. प्रकाश आवाडे यांनी यंदाच्या विधानसभेत अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसचे वजनदार घराणे म्हणून आवाडे कुटुंबाकडे पाहिले जाते. सुमारे पाच दशके त्यांनी जिल्ह्याच्या राजकारणावर दबदबा ठेवला होता. कलाप्पा आवाडे यांनी नगराध्यक्ष, आमदार, मंत्री, दोन वेळा खासदार अशी पदे भूषवली आहेत. प्रकाश आवाडे हे चार वेळेस आमदार तर दोन वेळा मंत्रिपदावर होते. याशिवाय त्यांच्या पत्नी किशोरी आवाडे या इचलकरंजीच्या सर्वाधिक सात वर्षे नगराध्यक्ष होत्या. त्यांनीच पक्षाची साथ सोडल्यामुळे कोल्हापुरात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

COMMENTS