बंगळुरूमध्ये विरोधकांची एकजूट, महाआघाडीचे संकेत, भाजपची होऊ शकते कोंडी !

बंगळुरूमध्ये विरोधकांची एकजूट, महाआघाडीचे संकेत, भाजपची होऊ शकते कोंडी !

बंगळुरूमध्ये धर्मनिरपक्ष जनता दलाचे नेते एच डी कुमारस्वामी यांचा मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे जी परमेश्वर यांचा उपमुख्यमंत्री म्हणून आज शपथविधी झाला. एका राज्याचा हा शपथविधीचा कार्यक्रम असला तरी संपूर्ण देशाचं लक्ष या कार्यक्रमाकडं लागलं होतं. कारण भाजप विरोधी पक्षांचे सर्वच दिग्गज नेते या शपथविधीला उपस्थित होते. या घटनेकडं 2019 च्या निवडणुकीची विरोधकांची पूर्वतयारी म्हणून पाहिलं जातंय. 2019 मध्ये भाजप विरोधकांची महाआघाडी तयार करण्याचे संकेत आजच्या कार्यक्रमातून विरोधकांनी दिले आहेत.

शपथविधीच्या कार्यक्रमाला काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, युपीएच्या अध्यक्ष सोनिया गांधी, शरद पवार, चंद्रबाबू नायडू, ममता बॅनर्जी, मायावती, अखिलेश यादव, सिताराम येचुरी, अजितसिंग, एम के स्टॅलिन यांच्यासह अनेक छोट्या मोठ्या पक्षाचे नेते उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने विरोधकांनी एकप्रकारे शक्तीप्रदर्शन केलं. या कार्यक्रमाला उपस्थित असेलल्या बहुतेक नेत्यांची त्यांच्या त्यांच्या राज्यात मोठी ताकद आहे. आगामी निवडणुकीत हे सर्व पक्ष एकत्रित आले तर त्याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

अखिलेश यादव, मायावती आणि अजितसिंग या उत्तर प्रदेशातील नेत्यांची या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. 2019 मध्ये हे तीन पक्ष आणि काँग्रेस एकत्र आले तर याचा मोठा फटका भाजपला बसू शकतो. याची झलक नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये पहायला मिळाली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्या यांच्या राजीनाम्यामुळे रिकाम्या झालेल्या जागेवर सपा आणि बसपा एकत्र आल्यामुळे भाजपला पराभव स्विकारावा लागला. एकट्या उत्तर प्रदेशात लोकसभेच्या 80 जागा आहेत. त्यामध्ये गेल्यावेळी भाजप आघाडीला जवळपास 73 जागा मिळाल्या होत्या.

आंध्रप्रदेशात लोकसभेच्या 25 जागा आहेत. तिथे भाजपची ताकद नगण्य आहे. काँग्रेस आणि तेलगू देशम एकत्र आल्यास आंध्रप्रदेशात भाजपला फटका बसू शकतो. मोदी सरकारच्या स्थापनेपासून चंद्रबाबू नायडू भाजपसोबत होते. आता तिथे वायएसआर काँग्रेसचे जगनमोहन भाजपसोबत गेल्यास काही प्रमाणात भाजपाचा फायदा होऊ शकतो. आंध्रप्रदेशात लोकसभेच्या 25 जागा आहेत. तर शेजारच्या तेलंगणामध्ये टीएसआरच्या के चंद्रशेखरराव यांच्या मजबूत पकड आहे. तिथे लोकसभेच्या 17 जागा आहेत. त्यापैकी तब्बल 11 जागा टीएसआरकडे आहेत.

पश्चिम बंगालमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये भाजपची ताकद वाढली असली तरी ममता बॅनर्जी यांचे निर्विवाद वर्चस्व तिथे आहे. पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या 42 जागा आहेत. त्यापैकी तब्बल 34 जागा टीएमसीकडे आहेत. तर काँग्रेसकडे 4 आणि डावे आणि भाजप यांच्याकडे प्रत्येकी दोन जागा आहेत. काँग्रेस आणि तृणमुल एकत्र आल्यास तिथे त्यांची स्थिती आणखी मजबूत होऊ शकते. बिहारमध्येही आरजेडी आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची युती झाल्यास त्यांच्या जागा वाढू शकतात. जयललितांच्या निधनानंतर अण्णा द्रमुकमध्ये पडलेली फूट द्रमुक आणि काँग्रेस यांच्या पथ्थ्यावर पडण्याची शक्यता आहे.

COMMENTS