लातूर – खासदार सुनील गायकवाडांना भाजपच्या गोटातूनच मोठा विरोध, ‘यांना’ देणार उमेदवारी ?

लातूर – खासदार सुनील गायकवाडांना भाजपच्या गोटातूनच मोठा विरोध, ‘यांना’ देणार उमेदवारी ?

मुंबई – लातूर लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातींसाठी राखीव आहे. काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर या दिग्गज काँग्रेस नेत्यांचा जिल्हा हा २०१४ च्या लोकसभेत भाजपने सर केला. हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात असून विद्यमान खासदार सुनील गायकवाड आहेत. मात्र त्यांच्या नावाला भाजपच्या गोटातूनच मोठा विरोध असल्याची जोरदार चर्चा आहे.

खा. गायकवाड यांच्या गेल्या पाच वर्षाच्या कारकिर्दीला खुद्द भाजप कार्यकर्तेच नाखूष आहेत. ज्यात पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्यासहीत बहुतांश पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचाही समावेश असल्याची चर्चा रंगत आहे. त्यामुळेच त्यांच्या नावाला मोठा विरोध हा पक्ष पातळीवर होत असल्याचे समजते. त्यामुळे खा. सुनील गायकवाड ऐवजी भाजपचे चाकूर तालुक्यातील वडवळ नागनाथ गटातील जिल्हा परिषद सदस्य सुधाकर शृंगारे यांचेच नाव आगामी लोकसभेचे भाजपचे उमेदवार म्हणून जाहीर होईल असेही भाजपचे स्थानिक नेते सांगत असल्याचीही जोरदार चर्चा आहे.

तर काँग्रेसकडून अद्याप उमेदवार जाहीर झालेला नाही. काँग्रेसच्या गोटातून पाच नावे सध्या आघाडीवर असल्याचीही जोरदार चर्चा आहे. ज्यात जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष पृथ्वीराज शिरसाठ, माजी सनदी अधिकारी भा.ई. नागराळे, डॉ. शिवाजी काळगे, ऍड. प्रदीपसिंह गंगणे आणि मछिंद्र कामत ही नावं चर्चेत आघाडीवर आहेत. या नावावर दिल्लीत खलबत्ते सुरु असले तरी माजी राज्यमंत्री तथा काँग्रेस नेते अमित देशमुख हे ज्यांच्या नावाला हिरवा कंदील देतील त्याच  उमेदवाराला तिकीट मिळण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवसात दोन्ही पक्षाची उमेदवार ठरण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

COMMENTS