काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांकडून लोकसभेची ‘ती’ जागा लढण्यास नकार !

काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांकडून लोकसभेची ‘ती’ जागा लढण्यास नकार !

मुंबई – काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी लोकसभेची जागा लढण्यास नकार दिला आहे. त्यामुळे उमेदवार निवडीवरुन काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची डोकेदुखी वाढली असल्याचं दिसत आहे. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे माजी आमदार डॉ. कल्याण काळे आणि माजी मंत्री राजेंद्र दर्डा यांनी लोकसभा निवडणूक लढण्यास पक्षश्रेष्ठींकडे नकार दिला असल्याची माहिती आहे. त्यामुळे काँग्रेसकडे या मतदारसंघासाठी सक्षम उमेदवार नसल्याचं दिसत आहे.

दरम्यान ही जागा काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीमध्ये सुरूवातीपासून काँग्रेस लढवत आली आहे. यावेळेसही ही जागा काँग्रेसकडेच आहे. परंतु आता ही जागा लढवण्यास काँग्रेसच्या नेत्यांनी नकार दिला आहे. गेल्या 25 वर्षांपासून या मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार पराभूत होत आला आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यांनी ही जागा लढवण्यास नकार दिला असल्याचं बोललं जात आहे.

तसेच या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेत्यांनी मात्र आग्रह धरला आहे. ही जागा राष्ट्रवादीला द्या अशी मागणी सातत्याने स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून राष्ट्रवादीच्या नेत्यांकडे करण्यात येत आहे. प्रत्यक्ष भेटून, निवेदन देऊन कुठल्याही परिस्थितीत यावेळी ही जागा राष्ट्रवादीनेच लढवावी असा आग्रह पदाधिकारी कार्यकर्त्यांनी धरला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील काँग्रेसकडे हा प्रस्ताव दिला होता.

या मतदारसंघावर गेल्या 25 वर्षांपासून शिवसेनेचं वर्चस्व आहे. १९८९ पासून औरंगाबादला शिवसेनेचाच खासदार निवडून आलेला आहे. त्यामुळे यावेळेस ही जागा राष्ट्रवादीला दिली तर याठिकाणी शिवसेनेला पराभवाची धूळ चारली जाणार का हे पाहणं गरजेचं आहे.

 

COMMENTS