लोकसभेत चर्चेदरम्यान उडाली कागदी ‘विमानं’ !

लोकसभेत चर्चेदरम्यान उडाली कागदी ‘विमानं’ !

नवी दिल्ली  लोकसभेमध्ये आज चर्चेदरम्यान कागदी विमानं उडाली असल्याचं पहावयास मिळालं आहे. सभागृहातील कामकाजादरम्यान काँग्रेस आणि भाजपच्या खासदारांनी चागंलाच गदारोळ केला होता. यादरम्यान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी बोलत असताना भाजपच्या सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. तर सरकारच्या वतीने उत्तर देताना अरुण जेटलींच्या भाषणादरम्यान काँग्रेसच्या खासदारांनी कागदी विमान त्यांच्या अंगावर भिरकावली. त्यामुळे सभागृहातील वातावरण चांगलच तापलं असल्याचं पहावयास मिळालं आहे. त्यामुळे सभागृहाचं कामकाज काही काळ तहकूबही करण्यात आलं होतं.

दरम्यान यावेळी चर्चेत दोन्ही बाजूंचे नेते बोलत असताना जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. काँग्रेसचे सदस्य पंतप्रधान चौर है, चौकिदार चोर हे, अशा घोषणा देत होते तर भाजपचे सदस्य, राहुल का पुरा खानदान चोर है अशा घोषणांनी त्यांना प्रत्युत्तर देत होते.

यावेळी राहुल गांधी यांनी राफेल प्रकरणावरुन सरकारवर जोरदार टीका केली. राफेलवरुन सर्व देश पंतप्रधानांच्या भूमीकेवर संशय व्यक्त करतोय. त्यांनी एकाही प्रश्नाचं नीट उत्तर दिलं नाही. पंतप्रधानांना सर्वांसमोर येवून बोलण्याची हिंम्मत नाही. राफेलचा जुना करार बदलून नवा करार का करण्यात आला. फक्त 36 विमानं खरेदी करण्याचा करार का करण्यात आला?राफेलच्या किंमती का वाढल्या. काही कंपन्यांनाच का निवडलं या सर्व प्रश्नांची उत्तरं सरकारला द्यावी लागतील असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

तसेच राहुल गांधी यांच्या आरोपानंतर अरुण जेटली यांनी उत्तर दिलं. या देशातल्या काही घराण्यांना फक्त पैशाचं गणित कळतं.काँग्रेसला देशाच्या सुरक्षेशी काहीही देणं घेणं नसून कारगील युद्धाच्यावेळी देशाच्या लष्कराजवळ पुरेशी शस्त्र नव्हती. युपीए सरकाने देशाच्या सुरक्षेसोबत तडजोड केली असून 15 वर्षांपूर्वी राफेलचा करार केला होता. पण काहीही झालं नाही. देशाला ही निर्णय प्रक्रिया परवडणारी नाही. बोफोर्स प्रकरणातही अनेक नावं आली होती. ती पुन्हा घ्यायची का? सुप्रीम कोर्टानं निर्णय दिल्यानंतरही काँग्रेस देशाचा वेळ घालवत असल्याचं यावेळी जेटली यांनी म्हटलं आहे.

COMMENTS