माढा लोकसभेचा उमेदवार ठरवण्यासाठी टेंभुर्णीच्या माळरानावार खलबतं, “या” उमेदवारावर झालं एकमत ?

माढा लोकसभेचा उमेदवार ठरवण्यासाठी टेंभुर्णीच्या माळरानावार खलबतं, “या” उमेदवारावर झालं एकमत ?

माढा – माढा लोकसभा मतदारसंघ सध्या जोरात चर्चेत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी कोणाला यावरुन सध्या उलट सुलट चर्चा सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील हे सध्या माढा लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करत आहेत. गेल्यावेळी म्हणज्येच 2014 मध्ये मोदी लाटेतही मोहिते पाटील यांनी हा मतदारसंघ खेचून आणला. पक्षाचं संघटन आणि मोहिते पाटील यांची ताकद याच्या जोरादवर मोदी लाट फिकी पडली होती.

यावेळी मात्र मोहिते पाटील यांना जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी विरोध केल्याचं बोललं जातंय. मग मोहिते पाटील यांना पर्याय म्हणून फलटणचे रामराजे निंबाळकर आणि माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांची नावं चर्चेत आहेत. पण या मतदारसंघात जसे मोहिते पाटील यांना विरोध करणारा गट आहे. तसाच रामराजे निंबाळकर यांना विरोध करणारा गट आहे. त्यामुळे मोहिती पाटील आणि रामराजे नको असलेले नेते माढ्यातून वेगळाच उमेदवार देण्याच्या तयारीत आहेत. त्याचसाठी टेंभुर्णीच्या माळराणावर उमेदवारीबाबतची खलबतं झाली आहेत.

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांच्या टेंभूर्णीतील फार्म हाउसवर ही बैठक झाली. या बैठकीला संजय शिंदे यांच्याशिवाय, बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत, सांगोल्याचे माजी आमदार शहाजीबापू पाटील, माळशिरसचे उत्तम जानकर, माण खटावचे आमदार जयकुमार गोरे हे उपस्थित होते. या बैठकीत मोहिते पाटील आणि रामराजे यांच्या घरण्याला विरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसंच शहाजीबापू पाटील यांचं नाव उमेदवार म्हणून पुढे केल्याचंही समजतं आहे.

आघाडीमध्ये ही जागा राष्ट्रवादीकडे आहे. आणि ती राष्ट्रवादीकडेच राहणार यात शंका नाही. त्यामुळे मोहिते पाटील आणि रामराजे विरोधकांना मग भाजप किंवा शिवसेना यांची उमेदवारी घेण्याशिवाय पर्याय राहणार नाही. संजय शिंदे, उत्तम जानकर आणि शहाजी बापू पाटील हे मोहिते पाटील यांचे विरोधक आहेत. तर जयकुमार गोरे हे रामराजे निंबाळकर यांचे विरोधक आहेत. तसंच राष्ट्रवादीच्या प्रभाकर देशमुख यांच्या उमेदवारीला गोरे यांचा विरोध असल्याचं बोललं जातंय.  जयकुमार सध्या काँग्रेसचे आमदार आहेत. जर त्यांनी उघडपणे विरोधी उमेदवाराला समर्थन केले तर ते पक्षांतर करणार का असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

COMMENTS