संपूर्ण राज्यात मराठा आंदोलनाची धग, वाचा राज्यात कुठे काय झाले !

संपूर्ण राज्यात मराठा आंदोलनाची धग, वाचा राज्यात कुठे काय झाले !

मुंबई – आरक्षणाच्या मागणीवरुन आज मराठा समाजानं महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या आंदोलनाची धग संपूर्ण राज्याला बसली असल्याचं दिसत आहे. अनेक ठिकाणी रस्तारोको, दगडफेक, आणि जोरदार घोषणाबाजीमुळे महाराष्ट्र हादरून गेला असल्याचं दिसत आहे. खालील ठिकाणी या आंदोलनाची धग मोठ्याप्रमाणात पहायला मिळाली आहे.

 बीड जिल्हा

मराठा संघटनांनी पुकारलेल्या बंदला बीड जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला,जिल्ह्यातील बहुतांश शाळा ,कॉलेज बंद ठेवण्यात आले तसेच या बंदचा सर्वाधिक फटका एसटी महामंडळाला बसला आहे,दिवसभरात होणाऱ्या 461 बस फे-यांपैकी एकही फेरी न झाल्याने महामंडळाचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच गेवराई तहसील इमारतीवर चढून दोन तरुणांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. या तरुणांना पोलीसांनी रोखले असून मराठा क्रांती मोर्चाचा तहसीलला घेराव घालण्यात आला.

 नांदेड जिल्हा

नांदेड जिल्ह्यात कडकडीत बंद पहायला मिळाला. तालुक्यांसह शहरातील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती. तर मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. काही ठिकाणी रास्तारोको करण्यात आला होता. तर खबरदारी म्हणून शाळा अर्ध्यातूनच सोडण्यात आल्या होत्या.

जालना जिल्हा

जिल्ह्यात सर्वत्र कडकडीत बंद पहायला मिळाला असून शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली होती. तसेच दुकाने बंद ठेऊन बंदमध्ये व्यापाऱ्यांनी सहभाग घेतला होता. तसेच एसटी बसेस काही ठिकाणी बंद,पण खाजगी वाहतूक सुरु असल्याने प्रवाशांवर परिणाम झाला नाही. तसेच मराठा समाजातील 161 आमदार,खासदारांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली.

सातारा जिल्हा

सातारा जिल्ह्यातही या आंदोलनाची धग पहायला मिळाली. कराड तहसिल कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. साता-यात सकल मराठा समाजाच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग  रोकण्यात आला होता. आंदोलक आक्रमक झाल्यामुळे पोलिस आणि आंदोलकांमध्ये धरपकड झाली. तसेच फलटण शहरात कडकडीत बंद पहायला मिळाला असून सातारा नजीक राष्ट्रीय महामार्ग रोकला तर कराडात हजारो मराठा बांधवांनी तहसिल कचेरी समोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.

हिंगोली जिल्हा

हिंगोली जिल्ह्याती कडकडीत बंद पहायला मिळाला आहे. शाळा महाविद्यालय बस बाजरापेठा कडकडीत बंद ठेवण्यात आल्या होत्या. तसेच जलसमाधी घेतलेल्या काकासाहेब शिंदे यांना जागोजागी श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. दुकाने बंद असतांना सामानाची नासधूस करण्यात आली. तसेच खानापूर चित्ता येथे पोलिसांची गाडी पेटवून देण्यात आली होती.

बारामती जिल्हा

मराठा समाज आरक्षणावरुन संतप्त झाला असल्याचं बारामतीतही पहायला मिळालं. प्रशासकीय भवनावर केली दगडफेक करण्यात आले. तसेच प्रांताधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर संतप्त तरुणांकडून दगडफेक करण्यात आली.

रायगड जिल्हा

रायगड जिल्ह्यात महाराष्ट्र बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला असून माणगावमध्ये बाजारपेठेतील दुकाने बंद ठेवण्यात आली होती. तसेच औषधे व अत्यावश्यक सेवा वगळता दुकाने , हॉटेल्स बंद ठेवण्यात आली होती. शाळा महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली असून एसटी व अन्य प्रवासी वाहतूक सुरळीत पहायला मिळाले.

यवतमाळ जिल्हा

यवतमाळ जिल्ह्यात बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती. याठिकाणी सकल कुणबी मराठा समाजाने बंदचे आवाहन केले होते.

लातूर जिल्हा

औसा येथे मराठा समाजातील आंदोलक आक्रमक झाले. आपल्या मागण्या मांडण्यासाठी औसा येथील तहसील कार्यालयात आंदोलक घुसले होते.त्यानंतर तहसीलच्या पायऱ्यावर आंदोलकानी ठिय्या मांडला. काही काळ तहसील कार्यालयाच्या आवारात तणाव निर्माण झाला होता. आंदोलक नागेश मुगळे व संतोष सूर्यवंशी हे दोन आंदोलक तहसील कार्यालया लगतच्या जीर्ण झालेल्या पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरु केले. आंदोलकानी तहसील कार्यालयाच्या पायऱ्यावर शासना विरोधात प्रचंड घोषणाबाजी केली.

 परभणी जिल्हा

परभणी जिल्ह्यात माध्यमांच्या कार्यालयावर  तरुणांकडून दगडफेक करण्यात आली.सामना, दैनिक देशोन्नती आणि पुढारीच्या कार्यालयावर दगडफेक करण्यात आली होती.

 नाशिक जिल्हा

मराठा आंदोलकांनी मुंबई-आग्रा महामार्ग रोखून धरला होता. जत्रा हॉटेलसमोर आंदोलकांनी रास्तारोको केला.

जळगाव जिल्हा

मराठा क्रांती मोर्चाच्या बंदच पडसाद उमटले असून संघटना रस्त्यावर होत्या. दुकाने सक्तीने केली बंद, जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन निवेदन देण्यात आले. नवी पेठ, फुले मार्केट परिसरात दुकाने बंद करण्याचे आवाहन करण्यात आले होते.

 

 

COMMENTS