थोरात गटाकडेच पुन्हा प्रदेशाध्यक्षपद ?

थोरात गटाकडेच पुन्हा प्रदेशाध्यक्षपद ?

लातूर : काँग्रेस पक्षात नेहमीच गटबाजी पहावयास मिळाली. ती गटबाजी विभागानुसार म्हणजे पश्चिम महाराष्ट् विरुध्द मराठावाडा विरुध्द विदर्भ अशी गटबाजी आहे. त्यातही बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, नितीन राऊत आणि राजीव सातव यांचे गट सक्रीय आहे. सध्या प्रदेश काँग्रेसमध्ये नेतृत्व बदलाची चर्चा रंगत आहे. त्यातही विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांचे प्रदेशाध्यक्ष पदासाठी निश्चित असल्याचे मानले जात असतानाच शुक्रवारी सकाळी पटोलेंऐवजी विलासराव देशमुख यांचे सुपूत्र व मंत्री अमित देशमुख यांचे नाव आता प्रदेशाध्यक्षपदासाठी समोर येतं आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष पद थोरात गटालाच दिले जाणार असल्याचे चर्चा आहे.

सध्या राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. यामध्ये प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या विधीमंडळाचे गटनेते आणि महसूलमंत्री पद आहे. एक व्यक्ती एक पद या नुसार थोरात यांनी पक्ष संघटनेत किंवा मंत्री पद यापैकी एका पदाचा राजीनामा द्यावा अशी दबक्या आवाजात मागणी होत होती. त्यास पक्षश्रेष्ठींचीही सहमती असल्याने नेतृत्व बदलाची चर्चा होऊ लागली. त्यानंतर अनेक जणांची नावे चर्चेत येऊ लागली. राज्यात भाजप ज्या पध्दतीने पक्ष विस्तार करीत आहे. त्यांना रोखण्यासाठी आक्रमक नेत्याची या पदावर निवड व्हावी, यासाठी नवीन प्रदेशाध्यक्षाचा शोध सुरू झाला. यामध्ये नाना पटोले, राज्यसभा खासदार राजीव सातव, विजय वड्डेटीवार आणि इतर नेत्यांची नावे समोर आली.

दरम्यान, काल नाना पटोले राजीनामा दिल्यानंतरही कुठल्याच काँग्रेस नेत्यानं पटोलेच प्रदेशाध्यक्ष असतील, असं म्हटलेलं नाही. दिल्लीतूनही अजून पटोलेंच्या नावाची प्रदेशाध्यक्षपदी घोषणा झालेली नाही. त्याच पार्श्वभूमीवर तरुण असलेल्या अमित देशमुख यांचं नाव प्रदेशाध्यक्षपदासाठी पुढं येत आहे. त्यांच्या नावाला राहुल गांधी ब्रिगेडकडून ग्रीन सिंगन आहे. अमित देशमुख हे थोरात गटाचे म्हणून ओळखले जातात. त्यांना माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि इतर गटांचा विरोध आहे. पण पक्षामध्ये नवीन नेतृत्वाला संधी देणे गरजेचे असल्याने आक्रमक नेत्यांची प्रदेशाध्यक्ष पदावर निवड होणार असल्याचे बोलले जात आहे.

COMMENTS