महाराष्ट्रातील नेते पंतप्रधानांची भेट घेणार

मुंबई – मराठा आरक्षणाबाबत दिल्लीत काल मराठा आरक्षण उपसमिती व वकिलांची बैठक झाली. या बैठकीत मराठा आरक्षणाच्या समर्थनात सर्व पक्षांच्या नेत्यांच्या शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घ्यावी, अशी चर्चा झाली. त्यानुसार पुढील काही दिवसात महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेत्यांचे शिष्टमंडळ पंतप्रधानांची भेट घेणार आहे, अशी माहिती मराठा आरक्षण उपस्थितीचे अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली.

महाराष्ट्र राज्य सरकारने मराठा समाजाला दिलेल्या सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग (एसईबीसी) म्हणून दिलेल्या आरक्षणासंदर्भात २५ जानेवारीपासून दैनंदिन स्तरावर सुनावणी सुरू होणार आहे. यासंदर्भात झालेल्या बैठकीस उपसमितीचे सदस्य बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे, दिलीप वळसे पाटील तसेच विधिज्ञ परमजितसिंग पटवालिया, विजयसिंह थोरात, अभिषेक सिंघवी, राहुल चिटणीस, सचिन पाटील, अक्षय शिंदे, वैभव सुगधरे उपस्थित होते. त्याचप्रमाणे विधिज्ञ मुकुल रोहतगी, कपिल सिब्बल, शासनाने नेमलेल्या वकिलांच्या समन्वय समितीचे सदस्य आशिष गायकवाड, राजेश टेकाळे, अनिल गोलेगावकर, अभिजित पाटील आदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठकीत सहभागी झाले होते.

या बैठकीत केंद्र सरकारनेही राज्य सरकारची बाजू अॅटोनी जनरल यांच्या माध्यमातून कोर्टात मांडावी, यासाठी सर्व पक्षीय शिष्टमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहे. त्यासाठी अशोक चव्हाण यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेतली. त्यांनी त्यास तयारी दर्शली आहे, अशी माहिती अशोक चव्हाण यांनी दिली

COMMENTS