आश्रमशाळेच्या संस्थाचालकांचा मंत्रीच्या बंगल्यासमोर आत्मदहनाचा इशारा !

आश्रमशाळेच्या संस्थाचालकांचा मंत्रीच्या बंगल्यासमोर आत्मदहनाचा इशारा !

मुंबई- अनुसूचित जातीच्या आश्रम शाळांना 20/08/2018 तारखेच्या आत अनुदान जाहीर केले नाही तर 21/08/2018 रोजी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्या मुबंई येथील निवासस्थानी सामूहिक आत्मदहन करणार असल्याचा इशारा आश्रमशाळेच्या संस्थाचालकांनी दिला आहे.

गेल्या कित्येक वर्षांपासून राज्यातील अनुसूचित जातीचे आश्रम शाळा हे अनुदान विना चालू आहे. त्यामुळे या आश्रम शाळेची अवस्था फारच बिकट आहे. वंचितांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी केंद्र सरकारने सन 1999 मध्ये अनुदानित स्वरूपाच्या प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळांना मान्यता दिली. यामध्ये महाराष्ट्रात 322 आश्रमशाळा सुरू झाल्या. त्यानंतर केंद्र शासनाने अनुदान देण्यावर हात झटकले. राज्यशासनाने या आश्रमशाळाना अनुदान देण्यासाठी विधानसभेत वेळोवेळी आश्वासने दिली. परंतु अश्वासनपूर्ती कोणीच केली नाही.

19 वर्षाच्या खडतर प्रवासात ठोस कार्यवाही केली नाही. त्यामुळे आश्रमशाळा संस्थापक कर्जबाजारी झाले आहेत. गेले 15 वर्षांपासून वेळोवेळी धरणे आंदोलने, मोर्चे, काढून सुद्धा मागण्या पूर्ण झाल्या नसल्याने आश्रमशाळेच्या संस्थाचालकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
जर 20 ऑगस्ट पर्यंत अनुदान संदर्भात निर्णय घेण्यात आला नाही तर 21 ऑगस्ट रोजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्या मुबंई येथील बंगल्यासमोर आत्मदहन करणार असल्याच निवेदन संस्थाचालकांच्या वतीने देण्यात आले आहे.

यापूर्वीही आश्रमशाळेचे संस्थाचालक पोपट खामकर आणि रोहिणी खामकर या दाम्पत्यानी मुख्यमंत्र्यांकडे अनुदान मिळत नसल्याने इच्छामरणाची परवानगी देण्यात यावी अशी मागणी केली होती. आता सर्वच संस्थाचालक एकत्र आल्याने अनुदानाच्या मागणीची तीव्रता वाढली आहे. म्हणून यावर शासन काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

COMMENTS