शेतकरी आंदोलनात महाविकास आघाडीचे नेते व मुख्यमंत्रीही सहभागी होणार

मुंबई – केंद्र सरकारने केलेल्या नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या वेशीवर अद्यापही शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु असून कोणताही तोडगा निघालेला नाही. दिल्लीतील शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी २३, २४, २५ जानेवारी रोजी आझाद मैदान येथे शेतकरी आंदोलन होणार आहे. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, उध्दव ठाकरे, बाळासाहेब थोरात सहभागी होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.

मंत्री नवाब मलिक म्हणाले, केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर ५२ दिवसांपासून शेतकरी आंदोलन सुरू असूनही केंद्र सरकार संवेदनशीलता दाखवत नाही. देशातील विरोधी पक्ष शेतकऱ्यांच्या सोबत असून आगामी काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील मंत्री कृषी कायद्यांविरोधातील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी रस्त्यावर उतरतील, असे सूतोवाच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी केले आहे.

“आंदोलक शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी मुंबईत मोर्चा काढण्याच्या विचाराला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शरद पवार यांनी होकार दिला आहे. आठवडाभरात हा मोर्चा काढण्याचे नियोजन असून एक-दोन दिवसांत त्याच्या तपशिलाबाबत अंतिम निर्णय होईल. करोनाविषयक नियम पाळून हा मोर्चा काढण्यात येईल,” असं नवाब मलिक यांनी सांगितलं होते.

COMMENTS