अर्थसंकल्पातून महाराष्ट्रावर अन्याय;  विरोधी पक्षांकडून टिका

अर्थसंकल्पातून महाराष्ट्रावर अन्याय; विरोधी पक्षांकडून टिका

मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज देशाचा अर्थसंकल्प केला. यावर महाविकास आघाडीतील पक्षाच्या नेत्यांकडून सडकून टीका करण्यात येत आहे. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ आणि ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी केंद्राच्या अर्थसंकल्पावर सडकून टीका केली आहे. विरोधी राज्यांना आर्थिक त्रास कसा द्यावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा अर्थसंकल्प असल्याची टीका मुश्रीफ यांनी केली आहे

केंद्र सरकारकडे महाराष्ट्राचं 38 हजार कोटी रुपयांचं देणं आहे. पण हा अर्थसंकल्प म्हणजे विरोधी राज्याला कशाप्रकारे आर्थिक त्रास दिला जावा, याचं उत्तम उदाहरण आहेराजकीय हेतू समोर ठेवत हा अर्थसंकल्प सादर केला गेलाय. या अर्थसंकल्पातून महाराष्ट्रावर अन्याय करण्यात आल्याचा आरोप हसन मुश्रीफ यांनी केला आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांची निराशा करणारा हा अर्थसंकल्प असल्याचंही मुश्रीफ यांनी म्हटले

केंद्रीय अर्थसंकल्पात आत्मनिर्भर भारतवर जोर देण्यात आला आहे. पण सरकारी संस्था विकून आत्मनिर्भर होणार आहोत का? असा सवाल महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी विचारला आहे. केंद्राला सर्वात जास्त कर महाराष्ट्र देतो. पण महाराष्ट्राकडे पाहण्याची त्यांची दृष्टी चांगली दिसत नाही. मुंबईतून सगळ्यात जास्त जीएसटी गोळा होतो पण मुंबईलाही काही दिलं नाही. अत्यंत निराशाजनक असा हा अर्थसंकल्प असल्याची टीका थोरात यांनी केली आहे.

अर्थसंकल्पाचा डोलारा हा महाराष्ट्रावर अवलंबून आहे. पण मी अर्थसंकल्पात महाराष्ट्र शोधण्याचा प्रयत्न करतोय, अशी खोचक टिप्पणी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. खिशात नाही आणा आणि बाजीराव म्हणा. तसे हे दिल्लीतील बाजीराव आहेत. नाशिक आणि नागपुरात भाजपची सत्ता असल्यामुळे मेट्रोसाठी निधी दिला. हे पटणारं नाही. यापुढे त्या शहरात त्यांची सत्ता राहणार नाही. मुंबईची मेट्रो का अडकून ठेवली? जमीन केंद्राची आहे म्हणतात. ही जमीन काय मंगळावरुन आणली आहे का? असा सवाल भुजबळ यांनी केंद्र सरकारला केला आहे.

COMMENTS