ममता बॅनर्जी यांना हादरा, एका खासदाराचा भाजपमध्ये प्रवेश!

ममता बॅनर्जी यांना हादरा, एका खासदाराचा भाजपमध्ये प्रवेश!

नवी दिल्ली –  पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का बसला आहे. तृणमूल काँग्रेसचे लोकसभेतील खासदार सौमित्र खान यांनी आज भाजपात प्रवेश केला आहे. सौमित्र खान हे गेल्या काही दिवसांपासून पक्षनेतृत्वावर नाराज होते. पोलीस अधिकाऱ्याने मला ठार मारण्याचा प्रयत्न केला, असा आरोप त्यांनी केला होता.

यानंतर पक्षश्रेष्ठींनी सौमित्र यांच्या या विधानावर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आज अखेर त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. तृणमूल काँग्रेसचे आणखी पाच खासदार निवडणुकीपूर्वी भाजपात प्रवेश करणार असल्याचा दावाही भाजपा नेत्यांनी केला आहे. त्यामुळे तृणमूल काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली आहे.

दरम्यान आज सकाळी सौमित्र खान यांनी अमित शाह यांची भेट घेतली. त्यानंतर  दुपारी त्यांनी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि पश्चिम बंगालमधील भाजपा नेते मुकूल रॉय यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. मला मोदींसोबत काम करायचे असून पश्चिम बंगालमधील कायदा आणि सुव्यवस्था दिवसागणिक ढासळत आहे. तसेच राज्यातील गुंडांना तृणमूल काँग्रेसचा पाठिंबा असल्याचा आरोपही त्यांनी केला.

COMMENTS