लोकसभेत पराभव करणारे धैर्यशील माने राजू शेट्टींच्या घरी, आशीर्वाद घेताच शेट्टींच्या आई म्हणाल्या…

लोकसभेत पराभव करणारे धैर्यशील माने राजू शेट्टींच्या घरी, आशीर्वाद घेताच शेट्टींच्या आई म्हणाल्या…

सांगली – हातकणंगले लोकसभा मतदारसंघात पराभव करणारे शिवसेनेचे नवनिर्वाचित खासदार धैर्यशील माने हे आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींच्या घरी गेले होते. माने आणि शेट्टींची ही अनोखी भेट पाहून जिल्ह्यातील सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. यावेळी राजू शेट्टी यांच्या पत्नी यांनी औक्षण करून सेना खासदार धैर्यशील माने यांचं स्वागत केलं. तसेच यावेळी फेटा बांधून राजू शेट्टी यांनी खासदार माने यांचं स्वागत केलं. खासदार माने यांनी राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत राजू शेट्टी यांच्या आईचा आशीर्वाद घेतला. यावेळी माझ्या मुलाने जसं केलं तसं तू कर असा आशीर्वाद राजू शेट्टी यांच्या आईनं दिला.

दरम्यान शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचा तब्बल 1 लाख 4 हजार मतांनी पराभव केला होता. गेल्या निवडणुकीत राजू शेट्टी हे महायुतीत सहभागी होते. मात्र यंदा त्यांनी महाआघाडीसोबत हातमिळवणी करत लोकसभेची निवडणूक लढवली. निवडणुकीच्या निकालाने थोडा खचलो आहे. मात्र निवडणुकीत पराभव झाला तरी शेतकऱ्यांसाठीचा संघर्ष सुरु राहील, असं त्यांनी आपल्या कवितेच्या माध्यमातून सांगितलं आहे.

आजपासून…

मी संत नाही शांत आहे
गोतावळ्यातून दुरावलो
याची मनात खंत आहे
कट करून गाडलेल्या
बळीचा मी पुत्र आहे
” ज्याला फळं… त्यालाच दगडं…”
हे जगाचं सूत्र आहे..

मी खचलो नाही
थोडासा टिचलो आहे…
ते कोण मला बेदखल करणार ?
मी बळीराजाच्या काळजातच
घर करून बसलो आहे…

म्हणून चला .. भूमीपुत्रांनो उठा
नवा एल्गार करू…
गोरगरिबांच्या हक्कासाठी
आजपासून संघर्षाचा
नवा अध्याय सुरू…!!
– राजू शेट्टी

COMMENTS