नोव्हेंबरपर्यंत आरक्षण जाहीर केलं नाही तर 1 डिसेंबरपासून ठिय्या आंदोलन – मराठा क्रांती मोर्चा

नोव्हेंबरपर्यंत आरक्षण जाहीर केलं नाही तर 1 डिसेंबरपासून ठिय्या आंदोलन – मराठा क्रांती मोर्चा

मुंबई – मराठा क्रांती ठोक मोर्चानं आज मुंबईत आढावा बैठकीचं आयोजन केलं होतं.या बैठकीदरम्यान नोव्हेंबरपर्यंत आरक्षण जाहीर केलं नाही तर 1 डिसेंबरपासून ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चानं दिला आहे. तसेच आंदोलनाचा दुसरा टप्पा काय असावा याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली असून परळी येथे सरकारने  नोव्हेंबरपर्यंत आरक्षणाची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होईल असं लेखी आश्वासन दिलं आहे. परंतु नोव्हेंबरपर्यंत सरकारने आरक्षण जाहीर केलं नाही तर राज्यभर १ डिसेंबरपासून ठिय्या आंदोलन केलं जाईल असं मराठा मोर्चानं म्हटलं आहे.

दरम्यान आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यात यावेत तसेच त्यांच्यावरील गुन्हे सरकार मागे घेणार नाही, त्या तरुणांना सर्व कायदेशीर मदत केली जाणार असून समाजातील विविध घटकांनी पोलीसांची परवानगी घेतल्याशिवाय आंदोलन करू नये. तसेच मराठा क्रांती ठोक मोर्चाशी चर्चा करून आंदोलन करावे असं त्यांनी म्हटलं आहे. केवळ सोशल मीडियावर मॅसेज टाकून आंदोलन करू नये, रितसर पत्रकार परिषद घेऊन आंदोलन करावे असं मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान पोलीसांवर हल्ला केलेले, दगडफेक केलेले मराठा समाजातील तरुण नव्हते यात समाजकंटक होते, तसेच काही परप्रांतीय देखील होते असंही आबासाहेब पाटील यांनी म्हटलं आहे. दरम्यान मराठा तरुणांवरील गुन्हे तात्काळ मागे घेतले नाहीत तर दोन दिवसात त्या – त्या पोलीस ठाण्यावर ठोक मोर्चा काढणार असल्याचा इशाराही पाटील यांनी दिला आहे.

तसेच अण्णासाहेब पाटील महामंडळाकडून मराठा तरुणांना 75 टक्के अर्थसहाय्य देण्याबाबतचा शासन निर्णय अद्याप महामंडळाकडे पोहचलेला नाही. याबाबत सरकारने लवकर पावलं उचलली नाही तर अण्णासाहेब पाटील महामंडळाला टाळं ठोकलं जाईल असंही पाटील यांनी म्हटलं आहे. तसेच मुस्लिम, धनगर यासह सर्व जातीच्या लोकांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा जाहीर केलेला असल्याचंही पाटील यांनी म्हटलं आहे.

COMMENTS