अधिवेशनात मराठा आरक्षणासाठी सरकार नवा कायदा करणार ?

अधिवेशनात मराठा आरक्षणासाठी सरकार नवा कायदा करणार ?

मुंबई – मराठा आरक्षणाबाबतचा अहवाल राज्य मागासवर्ग आयोगानं आज सादर केला आहे. हा अहवाल येत्या रविवारी 18 नोव्हेंबर रोजी होणा-या मंत्रीमंडळ बैठकीत मांडला जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच मंत्रीमंडळ बैठकीत अहवाल स्वीकारून सरकार आरक्षणासाठी पुढील प्रक्रिया सुरू करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच त्यानंतर 19 नोव्हेंबरपासून राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरू होत असून या अधिवेशनातच सरकार आरक्षणासाठी नवा कायदा करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. येत्या पंधरा दिवसांत मराठा समाजाला आरक्षण देऊ. त्यामुळे 1 डिसेंबरला मराठा समाजाने आंदोलन करण्यापेक्षा जल्लोष करण्यासाठी तयार राहा असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिशिंगणापूर येथे बोलताना केलं आहे. गेल्या अनेक वर्षापासून मराठा समाज आरक्षणाची मागणी करत आहे. समितीने अहवालही सादर केला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळणारच आहे. हे आरक्षण देताना इतर समाजाच्या आरक्षणाला मात्र धक्का लागणार नसल्याचंही यावेळी मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

 

COMMENTS