‘या’ महापालिकेत अवघे चार नगरसेवक असलेल्या पक्षाचा 47 नगरसेवक असलेल्या काँग्रेसला धक्का!

‘या’ महापालिकेत अवघे चार नगरसेवक असलेल्या पक्षाचा 47 नगरसेवक असलेल्या काँग्रेसला धक्का!

मुंबई – सर्वात जास्त नगरसेवक असलेल्या काँग्रेसला भिवंडी महापालिकेत जोरदार धक्का बसला आहे. अवघे चार नगरसेवक असणाऱ्या ‘कोणार्क विकास आघाडी’च्या नगरसेविका प्रतिभा पाटील यांची महापौरपदी निवड झाली आहे. तर उपमहापौरपदी काँग्रेसचे बंडखोर इमरानवल्ली यांची निवड झाली आहे.भाजप आणि काँग्रेसच्या नगरसेवकांनी बंडखोरी केल्यामुळे ‘कोणार्क विकास आघाडी’ला हा विजय मिळवता आला आहे.भिवंडी महापौरपदाच्या निवडणुकीत कोणार्क विकास आघाडीच्या उमेदवार प्रतिभा पाटील यांना 49 मतं मिळाली तर काँग्रेसच्या रिषिका राका यांना 41 मतं पडली. काँग्रेसचे 18 नगरसेवक फुटल्याने पक्षाला मोठा झटका बसला. प्रतिभा पाटील यांना भाजपच्या 20, काँग्रेसच्या 18 बंडखोर, स्वपक्ष अर्थात कोणार्क विकास आघाडीच्या 4, समाजवादी पक्षाच्या 2, रिपाइं (एकतावादी) गटाच्या 4 आणि एका अपक्ष नगरसेवकाने मतदान केलं. या नगरसेवकांनी बंडखोरी केल्यामुळे याठिकाणी काँग्रेसची सत्ता गेली आहे.

दरम्यान 47 नगरसेवक असणाऱ्या काँग्रेसची भिवंडी महापालिकेत सत्ता होती. अगदी मोदी लाटेतही भिवंडीत काँग्रेसने या ठिकाणी निर्भेळ यश मिळवलं होतं. परंतु जे मोदी लाटेत टिकवलं, ते बंडखोरीच्या पुरात काँग्रेसला राखता आलं नसल्याचं दिसत आहे. अवघे चार नगरसेवक असलेल्या कोणार्क विकास आघाडीने काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे.

COMMENTS