मुंबईला एका बुस्टर डोसची गरज, तो महाविकास आघाडीसाठी हितावह ठरणार, जितेंद्र आव्हाडांचं   मुख्यमंत्र्यांना पत्र!

मुंबईला एका बुस्टर डोसची गरज, तो महाविकास आघाडीसाठी हितावह ठरणार, जितेंद्र आव्हाडांचं मुख्यमंत्र्यांना पत्र!

मुंबई – मुंबईला एका बुस्टर डोसची गरज आहे, तो महाविकास आघाडी सरकारसाठी सामाजिक, आर्थिक आणि राजकीयदृष्ट्या हितावह ठरणार असल्याचं गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. याबाबत आव्हाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. यामध्ये आव्हाड यांनी मुंबईला धारावी पुनर्विकासाच्या बुस्टर डोसची गरज आहे.धारावी पुनर्विकासाला चालना देण्याची हीच वेळ आहे. रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, आर्थिक उलाढालीला सुरुवात होईल, व्हेंटिलेटरवर असलेल्या बांधकाम उद्योगाला जीवनदान मिळेल. मुंबईला एका बुस्टर डोसची गरज आहे. तो धारावी पुनर्विकासाचा असेल, मी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. असे ट्वीट जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.

दरम्यान धारावीसारख्या सर्व जाती-धर्माच्या वस्तीच्या भागाचा विकास केल्यास तो महाविकास आघाडी सरकारसाठी सामाजिक, आर्थिक आणि राजकीयदृष्ट्या हितावह ठरणार असल्याचं आव्हाड यांनी म्हटलं आहे. कोरोनामुळे धारावीसारख्या झोपडपट्ट्यांमध्ये कोणत्याही दर्जाच्या आरोग्य व्यवस्था नसल्यामुळे उपचार यंत्रणा पूर्णतः कोलमडून पडलेली दिसली. लोकांच्या मनात धारावीबद्दल नकारात्मक भावना निर्माण झाली आहे. त्यामुळेच आता धारावीच्या पुनर्विकासाएवढी सुंदर, सामाजिक, आर्थिक संधी महाविकास आघाडीला मिळणार नाही, अशा आशयाचं पत्र बांधकाम मंत्री जितेंद्र आव्हाडांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे.


याबाबतची संपूर्ण प्रक्रिया झाली असून आपण आपल्या स्तरावर बैठक आयोजित करुन धारावी पुनर्विकास प्रकल्प लवकरात लवकर सुरु करण्याचे आदेश द्यावेत ही विनंती आव्हाड यांनी पत्रातून केली आहे. त्यामुळे याबाबत आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे काय निर्णय घेतील हे पाहण गरजेचं आहे.

COMMENTS