मोहन भागवत ‘नोटा’ वर बोलले, मात्र नोटबंदीवर नाही, वाचा सरसंघचालकांची राजकीय फटकेबाजी आणि त्याचं विश्लेषण !

मोहन भागवत ‘नोटा’ वर बोलले, मात्र नोटबंदीवर नाही, वाचा सरसंघचालकांची राजकीय फटकेबाजी आणि त्याचं विश्लेषण !

दिल्ली – दिल्लीच्या विज्ञान भवनमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने तीन दिवसांच्या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या तीन दिवसात पहिले दोन दिवस सरसंघचालक मोहन भागवत यांचं भाषण होतं. तर काल म्हणज्ये तिस-या दिवशी प्रश्नोत्तराचा कार्यक्रम होता. विविध प्रश्नांना त्यांनी उत्तर दिली. मात्र याधध्ये पत्रकारांना थेट प्रश्न विचारण्याची मुभा नव्हती. आधीच्या दिवशी त्यांनी प्रश्न द्याचे होते. त्यातून सगळेच प्रश्न निवडले की काहीच निवडले हे त्यांनाच माहित….

एकंदरीत प्रश्नांचं स्वरुप पाहता, फारसे अडचणीत आणणारे प्रश्न नव्हते. संघ काय आहे आणि विविध प्रश्नांवर संघाची मते काय आहेत हे समजावे असेच त्याचे साधरणपणे स्वरुप होते. त्यातही देशातीव विविध क्षेत्रातील उच्चपदस्थ, विविध देशातील उच्चपदस्थ आणि विविध धर्मातील उच्चपदस्थ व्यक्ती यांना यासाठी बोलावले होते. देशातील विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनाही बोलावण्यात आलं होतं. मात्र भाजपच्या नेत्यांशिवाय फारशी कोणी हजेरी लावली नाही.

मतदान करताना नोटा हा पर्य़ाय असावा की नसावा असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी नोटा हा पर्याय मतपत्रिकेमध्ये नसावा असं म्हटलं आहे. लोकशाहीमध्ये कोणताही व्यक्ती असो किंवा पक्ष 100 टक्के आपल्या मनाप्रमाणे असू शकत नाही. जे कोणी उभे राहतील त्यातल्या सर्वात चांगल्या व्यक्तीला मतदान करावे असं त्यांचं म्हणणं होतं. नोटाला मत म्हणजे निवडणुकीला उभे असलेल्या सर्वात वाईट उमेदवाराला मदत होते असंही त्यांनी सांगितलं. त्यामुळे नोटा नसावा असं मत मोहन भागवत यांनी मांडलं.

नोटावर प्रश्न विचारल्यावर नोटावर बोलणारे मोहन भागवत देशाच्या आर्थिक विकासाबाबतच्या प्रश्नावर बोलले मात्र नोटबंदीचा विषय त्यांनी टाळला. 2014 नंतर संघाला अपेक्षित आर्थिक विकास होतो आहे का असा प्रश्न विचारल्यावर त्यांनी 100 टक्के नसला तरी  काही प्रमाणात का होईना संघाला अपेक्षित असा विकास होत असल्याचं ते म्हणाले. मात्र रोजगार निर्मिती, नोटाबंदी, काळा पैसा यावर सरसंघचालकांनी बोलणं टाळलं.

आरक्षणाच्या मुद्यावरही त्यांनी त्यांनी यावेळी सावध भूमिका घेतली. आरक्षणाबाबत आपले मत काय आहे ?   किती दिवस आरक्षण राहायला हवे ?  आर्थिक निकषावर आरक्षण असावे का ? असे प्रश्न त्यांना विचारण्यात आले होते. त्यावर घटनेप्रमाणे असलेल्या आरक्षणाला संघाचा पूर्ण पाठिंबा आहे. तसंच ज्यांना आरक्षण मिळत आहेत त्यांना जोपर्यंत त्याची गरज वाटते तोपर्यंत आरक्षण राहायला हवे असं मोहन भागवत यांनी सांगितलं. बिहार विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान त्यांनी आरक्षणाबाबत विधान केलं होतं. त्याचा बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपला फटका बसला होता. त्यामुळे यावेळी त्यांनी सावध भूमिका घेतली होती.

राम मंदिर, आणि जम्मू काश्मिरचं विभाजन यावरही त्यांनी भाजपप्रमाणे राजकीय उत्तरे दिली. अयोध्येमध्ये राम मंदिर लवकरात लवकर व्हायला हवे हे सांगताना ते कधी होईल ते मात्र सांगितलं नाही. जम्मू काश्मिरचं त्रिभाजन व्हायला हवे की नाही असाही प्रश्न मोहन भागवतांना विचारण्यात आला होता. मात्र त्यावही त्यांनी गरज असेल तर त्रिभाजन व्हायला हवं नसेल तर नको असं सांगतं आपली सुटका करुन घेतली. मुस्लिमांना संघाविषयी भिती वाटते यावर बोलताना त्यांनी भीती न बाळगता संघात यावे त्यांची भीती दूर होईल असं सांगत मुस्लिमांना संघाच्या शाखेत येण्याचं आवाहन केलं.

थोडक्यात काय तर मोहन भागवतांना फूलटॉस चेंडू येत होते. त्यावर ते फोर आणि सिक्सर मारत होते. फोर मारताना योग्य तो गॅप काढण्याचं त्यांचं कसंब अर्थातच वाखाणणयाजोगं होतं. समलैंगिकता याचा सन्मान करायला हवा असं सांगत काळाप्रमाणे संघ बदलतो आहे असं दर्शवत निवडणुकीच्या आधी संघाचं धोरण कसं सर्वसमावेश आहे हेही त्यांनी यातून सांगितलं. भविष्यातील भारत हा त्यांच्या भाषणाचा विषय असला तरी भविष्यातील भाजप कसा असेल हे त्यांनी सांगितलं. हे सांगताना त्यांनी ( 2019) निवडणुकीत भाजप कसा अधिकअधिक फायदा होईल याचीही काळजी घेतली असं दिसंतयं.

COMMENTS