अमोल कोल्हेंच्या पाठी पवार, पी. चिंदबरमांची थाप

अमोल कोल्हेंच्या पाठी पवार, पी. चिंदबरमांची थाप

मुंबई : दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावरुन तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणावर टीका करणारं जोरदार भाषण राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी लोकसभेत केले. अमोल कोल्हे यांनी पंतप्रधान मोदींच्या भाषणाचा समाचार घेताना शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला. तसंच सरकारच्या भूमिकेवर कडाडून हल्ला चढवला. कोल्हेंच्या याच भाषणाबद्दल शरद पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी कौतुक करून त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप टाकली.

अमोल कोल्हे यांनी सोमवारी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना मोदी सरकारला चांगलेच धारेवर धरले. त्यांनी शेतकरी आंदोनावरुनही सरकारला खडेबोल सुनावले. तसेच राष्ट्रपतींच्याच भाषणातील मुद्दे घेत त्यावर भाष्य करत मोदी सरकारची चांगलीच कोंडी केली. यावेळी त्यांनी शेतकरी प्रश्नावर सन्मानजनक तोडगा काढण्यासाठी सरकारने पुढे यावं, असं आपल्या भाषणातून ठासून सांगितले. त्यानंतर सायंकाळी पवारांच्या नवी दिल्लीतल्या निवासस्थानी डॉ. कोल्हे यांनी शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीवेळी देशाचे माजी गृहमंत्री तसंच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. या भेटीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाल्याची प्रतिक्रिया बैठकीनंतर अमोल कोल्हे यांनी दिली.

COMMENTS