खासदार अरविंद सावंत पुन्हा दिल्लीत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सोपवली ‘ही’ जबाबदारी!

खासदार अरविंद सावंत पुन्हा दिल्लीत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सोपवली ‘ही’ जबाबदारी!

मुंबई – शिवसेना, भाजपमधील राज्यातील युती तुटल्यानंतर शिवसेनेचे एकमेव केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर आता खासदार अरविंद सावंत हे पुन्हा दिल्लीत जाणार आहेत. सावंत यांची महाराष्ट्र राज्य संसदीय समन्वय समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील संसद सदस्यांची बैठक झाली होती. यावेळी केंद्र सरकारकडून प्रलंबित प्रस्तावांबाबत चर्चा करण्यात आली होती. या प्रस्तावांचा वेळोवेळी पाठपुरावा करण्यासाठी खासदार अरविंद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान केंद्र सरकारकडे प्रलंबित असलेल्या राज्यातील विविध प्रस्तावांचा पाठपुरावा करण्यासाठी संसदीय समन्वय समितीची स्थापना करण्यात आली आहे. समितीचे अध्यक्ष सावंत यांचं कार्यालय नवी दिल्ली महाराष्ट्र सदन येथे असणार आहे. त्यांना कामकाजासाठी आवश्यक सुविधा पुरवण्याची जबाबदारी ही नवी दिल्लीतील सचिव तथा निवासी आयुक्त, महाराष्ट्र सदन यांच्याकडे असणार आहे.त्यामुळे खासदार अरविंद सावंत हे पुन्हा दिल्लीत दिसणार आहेत.

COMMENTS