मध्य प्रदेशात काँग्रेसला धक्का,  कमलनाथ यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा !

मध्य प्रदेशात काँग्रेसला धक्का, कमलनाथ यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा !

भोपाळ – मध्य प्रदेशात काँग्रेसला मोठा धक्का बसला असून पुरेसं संख्याबळ नसल्याने बहुमत चाचणीआधीच कमलनाथ यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे काँग्रेसचं सरकार कोसळलं आहे.सर्वोच्च न्यायालयाने आज सायंकाळी 5 वाजेपर्यंत कमलनाथ सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले होते. परंतु मुख्यमंत्री कलमनाथ यांनी पत्रकार परिषद घेत राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं आहे. राज्यपाल लालजी टंडन यांना भेटून त्यांच्याकडे राजीनामा देणार असल्याचे कमलनाथ यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. भाजपने षडयंत्र रचून आमचे सरकार पाडल्याचा आरोप कमलनाथ यांनी केला आहे.

दरम्यान मध्य प्रदेशमधील काँग्रेसचे दिग्गज नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर काँग्रेसच्या २३ आमदारांनी बंडखोरी करीत आपल्या पदाचे राजीनामे दिले होते. यामध्ये कमलनाथ यांच्या सरकारमधील सहा मंत्र्यांचाही समावेश होता. त्यामुळे फ्लोअर टेस्टची मागणी करत माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते शिवराज सिंह चौहान यांनी सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले होते.

त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने यावर निकाल देत शुक्रवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत कमलनाथ सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु पुरेसं संख्याबळ नसल्याने बहुमत चाचणीआधीच कमलनाथ यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता भाजप राज्यपालांकडे सरतार स्थापण्याचा दावा करणार आहे.

COMMENTS