मुंबईतील काँग्रेस, राष्ट्रवादीचे ‘हे’ नेते शिवसेना आणि भाजपच्या वाटेवर!

मुंबईतील काँग्रेस, राष्ट्रवादीचे ‘हे’ नेते शिवसेना आणि भाजपच्या वाटेवर!

मुंबई – विधानसभा निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं आहे. सर्वच पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. तरीदेखील काँग्रेसची गळती थांबता थांबत नसल्याचं दिसत आहे. कारण मुंबईतील काही नेते अजूनही शिवसेना, भाजपच्या वाटेवर आहेत. भायखळ्यात काँग्रेसला धक्का
बसणार असून भायखळा येथील काँग्रेसचे माजी नगरसेवक मनाेज जामसुतकर हे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेविका व पदाधिकारी सुनिता शिंदेही शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. थाेड्याच वेळात आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत माताेश्रीवर त्यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे. मनाेज जामसुतकर यांच्या पत्नी साेनल जामसुतकर सध्या काँग्रेसच्या नगरसेविका आहेत. त्यामुळे त्यादेखी शिवसेनेत जाणार का हे पाहण गरजेचं आहे.

मनोज जामसुतकर

दरम्यान बोरिवली मतदारसंघातही काँग्रेसला मोठा धक्का बसणार असल्याचं दिसत आहे. कारण एकमेव माजी नगरसेवक शिवा शेट्टी, नगरसेविका श्वेता कोरगावकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे त्यांच्या पक्षप्रवेश सोहळ्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.

उत्तर मुंबईतील महत्त्वाचा मतदारसंघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बोरीवली मतदारसंघातून काँग्रेसच्या शिवा शेट्टी यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाय्रा बोरीवली मतदारसंघातून काँग्रेसचे शिवा शेट्टी इच्छुक उमेदवार होते़ त्यांनाच उमेदवारी जाहीर होईल, अशी चर्चा होती. परंतु काँग्रेसने कुमार खिल्लारे यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे उमेदवारीसाठी इच्छुक शिवा शेट्टी यांनी बंडाचे शस्त्र उगारत अपक्ष म्हणून आपला अर्ज सादर केला होता. त्यानंतर त्यांनी आता भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे.

COMMENTS