राष्ट्रवादीच्या मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी ‘या’ नेत्याकडे  !

राष्ट्रवादीच्या मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी ‘या’ नेत्याकडे !

मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला असून राष्ट्रवादीचे नेते आणि राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. सचिन अहिर यांनी राष्ट्रवादी सोडत हाती शिवबंधन बांधलं आहे.’हा निर्णय घेताना मला त्रास झाला. पण राजकारणात काही कठोर निर्णय घ्यावे लागतात,’ असे भावनिक उद्गार सचिन अहिर यांनी काढले.

दरम्यान सचिन अहिर यांच्या जागी म्हणजेच राष्ट्रवादीच्या मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्याकडे सोपवली जाणार असल्याची माहिती आहे. याबाबतची अधिकृत घोषणा लवकरच पक्षाकडून केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

राष्ट्रवादीला धक्का वगैरे अजिबात बसलेला नाही -मलिक

सचिन अहिर यांनी पक्ष सोडल्यानंतर मलिक यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. अहिर यांना पक्षानं १५ वर्षे लाल दिवा दिला. त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि त्यांनी कठीण काळात पक्षाची साथ सोडली. त्यांचा हा निर्णय अत्यंत दु:खद आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे पदाधिकारी पक्षासोबतच आहेत. कुणीही अहिर यांच्यासोबत गेलेलं नाही. मुळात त्यांची ताकदच तेवढी नव्हती. तसं असतं तर ते प्रवाहाविरुद्ध पोहले असते. एखादी जबाबदारी झेपत नव्हती तर त्यांनी पक्षाला तसं सांगायला हवं होतं, तसेच अहिर यांच्या जाण्यानं राष्ट्रवादीला धक्का वगैरे अजिबात बसलेला नाही. शिवसेना व भाजप वाढत असल्याचा भ्रम आहे. पुढच्या निवडणुकीत मुंबईत आम्ही त्यांचा पराभव करू, असं मलिक यांनी म्हटलं आहे.

COMMENTS