राज्यात लॉकडाऊन वाढणार, सरकारच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय, नवनिर्वाचित आमदारांच्या शपथविधीचाही मुहूर्त ठरला !

राज्यात लॉकडाऊन वाढणार, सरकारच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय, नवनिर्वाचित आमदारांच्या शपथविधीचाही मुहूर्त ठरला !

मुंबई -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चौथ्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. त्याबाबतचे नियम 18 मेपूर्वी जाहीर करु, असं त्यांनी सांगितलं आहे. त्या पार्श्वभूमीवरही महाविकास आघाडीच्या नेत्यांची आज बैठक पार पडली. कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेता राज्यात लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आता राज्यात लॉकडाऊन ३१ मेपर्यंत वाढवण्याबाबत महाविकासआघाडीच्या बैठकीत चर्चा झाली आहे.  तर १७ मे नंतर लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता देण्यात येणार आहे.  मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीच्या महत्त्वाच्या मंत्र्यांच्या बैठकीत याबाबत चर्चा झाली. राज्यातील कोराना रुग्णांचा वाढणारा आकडा लक्षात घेता महाराष्ट्रातील लॉकडाऊन सरकार ३१ मे पर्यंत वाढवणार आहे.

मुंबईतील शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या जागेत ही बैठक झाली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात मुख्य सचिव अजॉय मेहता आणि मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह उपस्थित होते.

या बैठकीत लॉकडाऊन आणि अर्थव्यवस्थेचा गाडा रुळावर कसा आणता येईल याबाबतची चर्चा झाली. या बैठकीत झोननुसार कुठल्या गोष्टी सुरु करता येतील यावर चर्चा झाली. अर्थव्यवस्थेसंदर्भात अभ्यास करण्यासाठी जी समिती स्थापन करण्यात आली होती, त्या समितीच्या अहवालावर मंथनही करण्यात आलं.

दरम्यान विधानपरिषदेच्या 9 रिक्त जागांची निवडणूक बिनविरोध झाली आहे. त्यानुसार शिवसेनेचे 2, राष्ट्रवादीचे 2 आणि काँग्रेसचा 1 तर भाजपचे 4 असे एकूण 9 उमेदवार बिनविरोध निवडले गेले. या सर्वांचा शपथविधी आता सोमवारी 18 मे रोजी होणार आहे. सर्व नवनिर्वाचित आमदार 18 मे रोजी दुपारी 1 वाजता विधानपरिषद सभापतींच्या उपस्थितीत विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ घेणार आहेत.
यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ घेणार आहेत.

COMMENTS