नांदेडच्या ‘त्या’ धाडशी बालकाचा राष्ट्रीय पातळीवर गौरव, पंतप्रधान मोदींच्या हस्ते मिळणार पुरस्कार !

नांदेडच्या ‘त्या’ धाडशी बालकाचा राष्ट्रीय पातळीवर गौरव, पंतप्रधान मोदींच्या हस्ते मिळणार पुरस्कार !

नांदेड – नांदेड जिल्ह्यातील परडी येथील नदाफ इजाज अब्दुल रौफ या चिमुरड्याला पंतप्रधान मोदींच्या हस्ते पुरस्कार दिला जाणार आहे. यावर्षीच्या राष्ट्रीय बाल शोर्य पुरस्कारानं त्याला सन्मानित करण्यात येणार आहे. राष्ट्रीय बाल शोर्य पुरस्काराची गुरुवारी घोषणा करण्यात आली असून देशातील 18 बालकांना शौर्य पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. भारतीय बालकल्याण परिषदेच्या अध्यक्षा गीता सिध्दार्थ यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 24 जानेवारी रोजी या शूर बालकांना गौरविण्यात येणार आहे.

30 एप्रिल 2017 रोजी परडी गावातील तलावात पाय घसरुन पडलेल्या दोन मुलींचा जीव इजाज अब्दुल रौफ या चिमुरड्याने धाडस दाखवून वाचवला होता. कोणताही विचार न करता 20 फूट खोल पाण्यात उडी घेऊन इजाजने चारपैकी तब्बसुम आणि आफरीन या दोन मुलींचे प्राण वाचवले आहेत. इजाज अब्दुलच्या या साहसी कार्याचे पंचक्रोशीत कौतुक होत आहे. त्याच्या साहसाची नोंद घेत देशातील सर्वोच्च बाल शौर्य पुरस्कारासाने पंतप्रधानांच्या हस्ते त्याचा सन्मान होणार आहे. २६ जानेवारी ला राजपथावर होणा-या पथसंचलनातही तो सहभागी होणार आहे.

7 मुली आणि 11 मुले अशा एकूण 18 बालकांना  वर्ष 2017 च्या राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्काराने सन्मानीत करण्यात येणार आहे. यामध्ये 3 बालकांना मरणोत्तर हा पुरस्कार जाहीर झाला आहे. पदक, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्कार प्राप्त बालकांना भारतीय बालकल्याण परिषदेच्यावतीने शालेय शिक्षण पूर्ण होईपर्यंत आर्थिक मदत करण्यात येते. तसेच, वैद्यकशास्त्र आणि अभियांत्रीकीचा अभ्यास करणा-या विद्यार्थ्यांना इंदिरा गांधी शिष्यवृत्तीअंतर्गत पदवी पूर्ण होईपर्यंत आर्थिक मदत पुरविली जाते. या धाडशी कार्यामुळे इजाजचं भविष्य आता उज्ज्वल होणार आहे.

 

COMMENTS