ईडीच्या भितीने राणेंचा भाजपमध्ये पळ : नाईक

ईडीच्या भितीने राणेंचा भाजपमध्ये पळ : नाईक

सिंधुदुर्ग – “नारायण राणेंची ईडी चौकशी होणार या भीतीने त्यांनी सरळ भाजपमध्ये पळ काढला, त्यामुळे राणेंना संजय राऊत यांच्यावर बोलण्याचा अधिकार नाही”, अशी टीका शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी भाजपचे राज्यसभा खासदार नारायण राणेंवर केली. नारायण राणे यांनी संजय राऊत यांना ईडीकडून आलेल्या नोटिसाबद्दल शिवसेनेवर टिका केली. यावर वैभव नाईक यांनी सिंधुदुर्गात माध्यमांशी बोलताना राणेंना प्रतित्तुर दिले.

नाईक म्हणाले, नारायण राणेंनी गेली दहा वर्षे अनेक आव्हाने आणि भविष्यवाणी केल्यात, काँग्रेसमध्ये असताना मी मुख्यमंत्री होणार त्यानंतर शिवसेना विसर्जित करणार, अशा वेगवेगळ्या घोषणा त्यांनी केल्या होत्या. या त्यांच्या घोषणांचं पुढे काय झालं हे लोकांना माहीत आहे, असं टीकास्त्रही वैभव नाईकांनी सोडलं. त्यामुळे राणेंच्या भविष्यवाणीला आता लोक काडीची किंमत देत नाहीत, अशा शब्दांत शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी राणेंचा समाचार घेतलाय.

गेले एक वर्ष महाविकास आघाडीचे सरकार कोसळेल, असं राणे अनेक वेळा म्हणाले होते. मात्र एक वर्षाच्या कालावधीनंतर हे सरकार अजून भक्कम झालंय. तसेच भाजपमध्ये गेलेले अनेक आमदार हे पुन्हा शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीत पुन्हा येत आहेत. अनेक राणे समर्थक शिवसेनेत येत आहेत. त्यामुळे स्वतःचं राजकीय भवितव्य टिकवण्यासाठीच ही राणेंची धडपड सुरू असल्याचा दावा वैभव नाईक यांनी केला आहे.

COMMENTS