नाशिक महापालिकेचा स्वच्छतागृहांच्याबाबतीत अस्वच्छ कारभार !

नाशिक महापालिकेचा स्वच्छतागृहांच्याबाबतीत अस्वच्छ कारभार !

नाशिक – शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता महिलांसाठी आवश्यक असलेल्या स्वच्छता गृहांचा विषयही गंभीर होत आहे. वेळोवेळी काही राजकीय पक्षाच्या महिला प्रतिनिधींनी या विषयी आवाज उठवला पण त्याचा फारसा प्रभाव दिसून येत नसल्याचे दिसत आहे. वास्तविक पाहता महिलाच नाही तर पुरूषांच्याही स्वच्छतागृहाचा तुटवडा शहरासाठी गंभीर विषय होत आहे. तसेच अस्तित्वात असणारी स्वच्छतागृहांमध्ये अस्वच्छतेचं साम्राज्य दिसून येत आहे. त्यामुळे नाशिककरांकडून महापालिकेच्या कामावर नाराजी व्यक्त केली जात आहे.

दरम्यान शहरात मेनरोड, एमजीरोड येथे मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी महिलावर्ग येत असतात मात्र या ठिकाणी कोठेही महिलांसाठी स्वच्छतागृहाची व्यवस्था नाही. शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत आहे, साहजीकच लोकसंख्येतही वाढ होते आहे. त्या दृष्टीकोनातून गंगापूररोड, शरणपूररोड, इंदिरानगर, नाशिक-मुंबई महामार्ग, नाशिक-पुणे महामार्ग, गुजरातकडे जाणारा मार्ग आदी ठिकाणी महिला व पुरूषांसाठीच्या स्वच्छतागृहांची नितांत आवश्यकता असतानाही त्याकडे महापालिकेकडून दूर्लक्ष केले जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

स्वच्छतागृहांसाठी अनेक वेळा निवेदनही देण्यात आली, मात्र महापालिकेला जाग येत नसल्याचेच दिसून येत आहे. एकीकडे स्मार्ट सिटी, सुंदर नाशिक स्वच्छ नाशिक यासारख्या घोषणांद्वारे शहराचा प्रचार होत असताना स्वच्छतागृहाच्या मुलभूत गरजेकडे महापालिकेचे अक्षम्य दूर्लक्ष होत असल्याने महिला वर्गाकडून नाराजीचा सूर आहे. महिलांच्या प्रती आदरभाव असलेल्या आणि महापालिकेत भाजपचीच सत्ता आणि त्यातून महापौर सुद्धा एक महिलाच असताना त्यांनी तरी याकडे लक्ष घालून हा प्रश्न निकाली काढावा अशी अपेक्षा महिलावर्गाकडून होत आहे.

 

 

COMMENTS