विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्यांनी उमेदवारी मागण्याचे टाळले!

विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्यांनी उमेदवारी मागण्याचे टाळले!

मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने इच्छुकांकडून उमेदवारी अर्ज मागवले होते. याबाबत राज्यातील अनेक मतदारसंघातून इच्छुकांनी आपले अर्ज पक्षाकडे दाखल केले आहेत. प्रत्येक मतदारसंघातून एकाहून अधिक नेत्यांनी उमेदवारीसाठी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे आता या मतदारसंघातून उमेदवारी निवडीचा पेच राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांपुढे निर्माण झाला आहे. त्यामुळे उमेदवारी देताना दुसरा उमेदवार दुखावला जाणार नाही याची देखील काळजी वरिष्ठांना घ्यावी लागणार आहे.

पुणे जिल्ह्यातील बारामती आणि आंबेगाव हे दोन मतदारसंघ सोडले तर सर्व इतर मतदारसंघात दोन किंवा त्यापेक्षा अधिक नेत्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. परंतु शिरुर विधानसभा मतदारसंघात उमेदवारीसाठी तीव्र इच्छुक असलेल्या दोन नेत्यांनी मात्र उमेदवारी अर्ज दाखल करण टाळलं आहे. यामध्ये जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद आणि पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल यांनी उमेदवारी घेणं टाळलं आहे. त्यामुळे हे दोन्ही नेते पक्षावर नाराज असल्याची चर्चा आहे.

दरम्यान मी विधानसभेसाठी सन २०१४ पासून तयारी करत आहे.  समोर कुणीही असला तरी त्याच्यावर मात करुन विधानसभेत पोहचण्याची माझी तयारी आहे. मात्र इच्छुकांच्या अर्ज भरण्याबाबत ऑनलाईन-ऑफलाईन संभ्रम झाल्याने मी राष्ट्रवादीच्या इच्छुकांच्या यादीत नसल्याची चुकीची चर्चा झाली असल्याचं पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांनी म्हटलं आहे.

 

COMMENTS