राष्ट्रवादी आणि भाजपच्या ‘त्या’ दोन आमदारांमध्ये विधानपरिषदेतच जुंपली, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण !

राष्ट्रवादी आणि भाजपच्या ‘त्या’ दोन आमदारांमध्ये विधानपरिषदेतच जुंपली, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण !

नागपूर –  विधीमंडळाच्या कामकाजादरम्यान राष्ट्रवादीचे आमदार आणि भाजपच्या आमदारामध्ये विधानपरिषदेत चांगलीच जुंपली होती. बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार  अमरसिंह पंडीत आणि भाजपतर्फे नुकतेच निवडून आलेले सुरेश धस यांच्यामध्ये ही खडाजंगी झाली. या दोघांमध्ये लागलेल्या कडाक्याच्या भांडणामुळे सभागृहाचं कामकाज स्थगित करण्याची वेळी आली होती. या दोन्ही आमदारांनी परस्परांच्या ताब्यात असलेल्या सहकारी संस्थामधली गैरप्रकार विधानपरिषदेत मांडले.

दरम्यान सभागृहात सुरेश धस यांनी थकबाकीदार संस्थांची यादी वाचण्यास सुरुवात करताच अमरसिंह पंडित यांनी हरकत घेत सुरेश धस हे वैयक्तीक व्देषापोटी निवेदन करीत असल्याचा आरोप केला. त्यानंतर आक्रमक झालेल्या अमरसिंह पंडित यांनी सुरेश धस यांचे वर्चस्व असलेल्या आष्टी दुध उत्पादक संघाने तरी शेतकऱ्यांचे पैसे कधी दिले ते सांगा, असा टोला लगावला. यावरून दोन्ही सदस्यांमध्ये सभागृहात चांगलीच खडाजंगी झाली होती. त्यानंतर मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी सुरेश धस यांची बाजू घेत जिल्हा मध्यवर्ती बॅंकांची वाट लावणारेच आता शेतक-यांच्या प्रश्नावर बोलत असल्याची टीका केली. त्यानंतर अमरसिंह पंडीत यांच्या बाजूने विरोधक आणि आमदार सुरेश धस यांच्या बाजूने सत्ताधारी एकवटल्याने सभागृहात चांगालाच गोंधळ झाला होता. या गोंधळानंतर सभागृहाचे कामकाज स्थगित करण्यात आले.

 

COMMENTS