राष्ट्रवादीचा उमेदवार म्हणाला, “शेतकरीच अजित पवारांना काय हिसका असतो ते दाखवून देतील!”

राष्ट्रवादीचा उमेदवार म्हणाला, “शेतकरीच अजित पवारांना काय हिसका असतो ते दाखवून देतील!”

सोलापूर – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना राष्ट्रवादीच्याच अधिकृत उमेदवारानं इशारा दिला आहे. करमाळा विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार संजय पाटील यांनी हा इशारा दिला आहे. करमाळा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीने अधिकृत उमेदवारी दिलेली असताना अचानक अपक्ष उमेदवार संजय शिंदे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे अजित पवारांचे दुर्दैवी वक्तव्य असून त्यांच्या वक्तव्याचा आम्हाला काहीही फरक पडणार नाही, उलट शेतकरीच अजित पवारांना काय हिसका असतो ते दाखवून देतील असं संजय पाटील यांनी म्हटलं आहे.

तसेच पक्षाने उमेदवारी दिल्यानंतर मी दोन वेळा मतदारसंघाचा दौरा पूर्ण केला. सर्वसामान्य जनतेचं प्रेम शरद पवारांवर आहे. त्यामुळे या निवडणुकीत राष्ट्रवादीला यश मिळणार असतानाही अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या उमेदाराचा प्रचार न करता अपक्षाला पाठिंबा जाहीर केला. तरी मी पूर्ण ताकदीनिशी शरद पवारांच्या विचारानुसार निवडणूक लढवणार असल्याचंही संजय पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान संजय मामा शिंदे हे अजित पवारांचे निकटवर्तीय मानले जातात. लोकसभा निवडणुकीतही संजय मामा शिंदे यांना माढ्यातून उमेदवारी देण्यात आली होती. आता अजित पवारांनी संजय मामा शिंदे यांच्यासाठी पक्षाच्या अधिकृत उमेदवारालाच विरोध केला आहे. त्यामुळे मतदारसंघात खळबळ उडाली आहे.

COMMENTS