विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध, काँग्रेसचा एक उमेदवार जाहीर तर राष्ट्रवादीचेही उमेदवार ठरले ?

विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध, काँग्रेसचा एक उमेदवार जाहीर तर राष्ट्रवादीचेही उमेदवार ठरले ?

मुंबई – विधान परिषदेच्या ९ जागांसाठी येत्या २१ मे रोजी निवडणूक होत असून या निवडणुरीसाठी कालच भाजपनं आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यानंतर आज काँग्रेसनं आपल्या एका उमेदवाराचं नाव जाहीर केलं आहे. काँग्रेसने जालन्याचे युवा कार्यकर्ते राजेश राठोड यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या नावाची घोषणा मुकूल वासनिक यांनी केली आहे. काँग्रेसने या निवडणूकीत एकच उमेदवार दिल्याने ही निवडणूक बिनविरोध होणार हे निश्चित झाले आहे.

दरम्यान शिवसेनेकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि निलम गो-हे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तसेच राष्ट्रवादीकडून माजी मंत्री शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं असल्याची माहिती आहे. तर भाजपकडून नागपूरचे माजी महापौर प्रविण दटके,गोपीचंद पडळकर,रणजीतसिंह मोहिते पाटील आणि अजित गोपछडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

राज्यसभा निवडणूकीत राष्ट्रवादीने आपल्या वाट्याला दोन जागा घेतल्याने या निवडणूकीत एक जागा लढवावी असा मतप्रवाह काँग्रेसमध्ये होता. मात्र काँग्रेसने या निवडणूकीत एकच उमेदवार उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसने राजेश राठोड यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे माजी मंत्री  नसीम खान आणि सचिन सावंत यांचा पत्ता कट झाला आहे. विधान परिषदेच्या निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत ही सोमवारपर्यंत असल्याने महाराष्ट्र विकास आघाडीचे सर्व उमेदवार आपले उमेदवारी अर्ज सोमवारी दाखल करणार आहेत.

COMMENTS