विधानसभेत विरोधक आक्रमक, घोटाळ्याच्या मुद्द्यावरुन चंद्रकांत पाटलांना घेरलं!

विधानसभेत विरोधक आक्रमक, घोटाळ्याच्या मुद्द्यावरुन चंद्रकांत पाटलांना घेरलं!

मुंबई – विधानसभेत विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला असून महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांनी केली आहे. पुण्यातील बिल्डरच्या फायद्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारचा 42 कोटी रुपयांचा महसूल बुडवला असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी केला आहे.

दरम्यान विधानसभेत काल जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटलांवर केलेले आरोप विधीमंडळ पटलावरून काढून टाकण्यात आले होते. त्यानंतर आज त्याच आरोपांना चंद्रकांतदादांनी सभागृहात उत्तर दिलं. त्यामुळे मग जयंत पाटील यांनी काल केलेले आरोप पुन्हा पटलावर घेण्याची मागणी केली. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आक्रमक पवित्रा घेत कामकाज नियमानुसार चालावं. एकतर्फी कामकाज सुरू आहे. लोकशाहीची थट्टा सुरू आहे काय?’ असा सवाल केला.

तर यावेळी चंद्रकांत पाटील यांची विनोद तावडे यांनी बाजू घेतली. नियम 35 आणि 48 नुसार कोणत्याही व्यक्तिविरोधात मानहानीकारक आरोपाला उत्तर देण्याची तरतूद आहे. काल 5 पर्यंत वेळ होती, मात्र 7 वाजले. काल झालेले आरोप दिवसभर माध्यमातून चालले, त्यामुळे उत्तर देणे गरजेचं असल्याचं तावडे यांनी म्हटलं.

COMMENTS