हा प्रकार अतिशय हास्यास्पद आहे-जयंत पाटील

हा प्रकार अतिशय हास्यास्पद आहे-जयंत पाटील

जळगाव: जेजुरी गडावरील पायरी मार्गावर जेजुरी संस्थानाच्या वतीनं अहिल्यादेवी होळकर यांचा पुर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचं अनावरण शरद पवार यांच्या हस्ते उद्या दुपारी होणार आहे. मात्र, तत्पूर्वीच आज पहाटे पडळकर यांच्या नेतृत्वाखाली काही कार्यकर्त्यांनी जेजुरीत जाऊन पुतळ्याचं अनावरण केलं. या प्रकराबाबत जयंत पाटील यांनी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर टीका केली. ‘राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रे’ निमित्त जयंत पाटील जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. चोपडा शहरात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

‘काही लोक प्रसिद्धीसाठी काही पण करतात. गोपीचंद पडळकरांनी केलेला प्रकार अतिशय हास्यास्पद आणि केविलवाणा आहे,’ अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचा समाचार घेतला.

‘आततायीपणा किती करायचा याला काही मर्यादा असते. पण मर्यादेचा भंग करणाऱ्या लोकांबद्दल काय बोलायचे? स्थानिक व्यवस्थापनाने ज्यांना निमंत्रित केले आहे, सन्मानाने ज्यांना बोलावले आहे, त्यांच्या हस्ते जे उदघाटन आहे, त्यावरच लोक विश्वास ठेवतात. आता प्रसिद्धीसाठी काही लोक, काहीही करतात. त्यांच्याबद्दल काय सांगणार? हा प्रकार अतिशय हास्यास्पद आहे,’ अशी टीका जयंत पाटील यांनी यावेळी केली.

COMMENTS