जयंत पाटलांविरोधात लढण्याची भाजपकडून मला खुली ऑफर, राष्ट्रवादीच्या नेत्याचा गौप्यस्फोट!

जयंत पाटलांविरोधात लढण्याची भाजपकडून मला खुली ऑफर, राष्ट्रवादीच्या नेत्याचा गौप्यस्फोट!

सांगली – राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याविरोधात लढण्याची भाजपकडून मला खुली ऑफर आली असल्याचा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे नेते आणि सांगली जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी केला आहे. भाजपचा एक मुख्य नेता मला फोन करतो. नुसतं एकदा मुख्यमंत्र्यांना भेटा, तुमचा योग्य कार्यक्रम लावतो म्हणतोय. इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातून जयंत पाटील यांच्याविरोधात तुम्हाला उमेदवारी देऊ अशी खुली ऑफर आली असल्याचं पाटील यांनी म्हटलं आहे. लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमात ते बोलत होते.

दरम्यान राजारामबापूंनी कॉलेज युवकाला कारखान्याचा संचालक करून सन्मान केला, मी मरेपर्यंत राजारामबापूंच्या विचारांचा, त्यांच्या कुटुंबाचा पाठीराखा राहीन. मला काही मिळाले नाही तरी चालेल, मात्र मी प्रतारणा करणार नाही, असे म्हणत त्यांनी भाजपची ऑफर नाकारली असल्याचे सुतोवाच केले आहे. तसेच आपण खाल्ल्या मिठाला जागणारा आहे असं म्हणत त्यांनी पक्षांतर करणाय्रा नेत्यांना टोला लगावला आहे.

COMMENTS