राष्ट्रवादीचा माजी खासदार शिवसेनेच्या वाटेवर?, पक्षाच्या कार्यक्रमाला मारली दांडी!

राष्ट्रवादीचा माजी खासदार शिवसेनेच्या वाटेवर?, पक्षाच्या कार्यक्रमाला मारली दांडी!

मुंबई – विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला आणखी एक धक्का बसणार असल्याचं दिसत आहे. कारण राष्ट्रवादीचे माजी खासदार संजय पाटील यांनी पक्षाचा कार्यक्रमाला दांडी मारली आहे. त्यामुळे संजय पाटील हे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मुंबईतील विक्रोळी मतदारसंघात राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी आज पक्षाचा कार्यक्रम घेतला. या कार्यक्रमाला संजय पाटील यांनी दांडी मारली, एवढच नाही तर कार्यक्रमाच्या पोस्टरवर त्यांचा फोटोही नाही त्यामुळे संजय पाटील हे पक्ष सोडणार असल्याची चर्चा रंगली आहे.

दरम्यान राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि संजय पाटील यांच्यामध्ये दोन वर्षांपूर्वी मोठा वाद झाला होता. या दोन्ही नेत्यांनी एकमेंकावर आरोपही केले होते. त्यामुळे संजय पाटील हे पक्षावर नाराज होते. त्यामुळे ते पक्ष सोडणार असल्याचं बोललं जात आहे.

काय होता वाद?

डिसेंबर 2016 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या देवनार कत्तलखाना येथील जाहीर मेळाव्यात पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक आणि पक्षाचे माजी खासदार संजय दिना पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला होता. त्यानंतर नवाब मलिक आणि संजय दिना पाटील यांनी एकमेकांविरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला होता. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवाब मलिक यांनी वॉर्डातील कार्यकर्त्यांचा देवनार कत्तलखाना येथे मेळावा आयोजित केला होता. यात संजय पाटील आणि नवाब मलिक यांच्यात वाद झाल्याने दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. त्यात मलिक यांच्या कार्यकर्त्यांनी तलवारी घेऊन अंगावर धावून येत आपल्याला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे संजय पाटील यांनी तक्रारीत म्हटले होते. या हल्लेखोरांमध्ये मलिक यांच्या भावाचाही सहभाग होता. त्यामुळे बचावासाठी पिस्तुल काढले, असे स्पष्टीकरण पाटील यांनी पोलिसांना दिले आहे. तर संजय पाटील यांना मेळाव्याचे आमत्रंण नसतानाही, जबरदस्ती मेळाव्यात घुसून त्यांनी बंदुकीने गोळ्या झाडून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे नवाब मलिक यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले होते. या दोन्ही नेत्यांचा हा वाद राज्यभर गाजला होता. राष्ट्रवादीनंही याची दखल घेत दोघांनाही कारणे दाखवा नोटीस बजावली होती.

COMMENTS