राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष नाराज, मुंबईतील बैठकीकडे फिरवली पाठ?

राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष नाराज, मुंबईतील बैठकीकडे फिरवली पाठ?

मुंबई – आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेस भवानात बैठकांचे सत्र सुरु केले आहे. विधानसभा मतदारसंघनिहाय आणि जिल्हानिहाय शरद पवार आढावा घेत आहेत. परंतु अशातच विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला आणखी एक धक्का बसणार असल्याचं दिसत आहे. कारण कोकणात राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत धुसफूस सुरु असून राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव हे नाराज असल्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

मुंबईत सुरु असणाऱ्या आढावा बैठकीला राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि दोनवेळा मंत्री राहिलेले भास्कर जाधव हे अनुपस्थित राहिले. प्रकृतीच्या कारणास्तव आपण बैठकीला हजर राहू शकलो नाही, असे जरी भास्कर जाधव यांनी सांगितले असले, तरी पडद्यामागील कारणं मात्र वेगळंच असल्याची चर्चा सुरु आहे.

दरम्यान भास्कर जाधव यांनी जरी प्रकृतीचं कारण देत अनुपस्थिती लावली असली, तरी गुहागर तालुक्यातून तालुकाध्यक्षांसह राष्ट्रवादीचा इतरही कुणी पदाधिकारी मुंबईतील बैठकीला उपस्थित राहिला नाही. त्यामुळे भास्कर जाधव यांच्या नाराजीची सध्या जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

COMMENTS