द्विधा मनस्थितीमुळे राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदाराचा शिवसेना प्रवेश लांबणीवर ?

द्विधा मनस्थितीमुळे राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदाराचा शिवसेना प्रवेश लांबणीवर ?

मुंबई – द्विधा मनस्थितीमुळे राष्ट्रवादीच्या विद्यमान आमदाराचा शिवसेना प्रवेश लांबणीवर गेला असल्याचं दिसत आहे. यवतमाळमधील पुसदचे आमदार मनोहर नाईक हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. परंतु त्यांचा शिवसेना प्रवेश रखडला असल्याचं दिसत आहे. नाईक द्विधा मनस्थितीत असून इंद्रनील नाईकांना शिवसेनेपाठोपाठ भाजपचीही ऑफर आहे. तसेच युतीची अनिश्चितता आणि शरद पवारांकडून देखील मनधरणी झाल्याने नाईकांचा निर्णय लांबणीवर गेला असल्याची माहिती आहे.

दरम्यान आमदार, माजी मंत्री व जेष्ठ नेते मनोहर नाईक यांचे कनिष्ठ चिरंजीव इंद्रनील नाईक यांनी आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडणार असल्याचे काही दिवसांपूर्वीच स्पष्ट केले होते. येत्या दोन दिवसात कुटुंबियांसोबत चर्चा करून पुढील निर्णय घेऊ असे सांगत त्यांनी आपल्याला भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांची ऑफर असल्याचा दावा केला होता. तसेच ते शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा होती. परंतु द्विधा मनस्थितीमुळे त्यांचा शिवसेना प्रवेश लांबणीवर गेला असल्याचं बोललं जात आहे.

पुसद मतदार संघ हा नाईकांचा गढ असून मनोहर नाईक यांचे पुतणे निलय नाईक हे याआधीच भाजपाच्या गळाला लागले आहेत. भाजपने त्यांना विधानपरिषद सदस्यत्व देखील बहाल केले. आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने हा मतदारसंघ युतीत शिवसेनेच्या वाट्याला असल्याने इंद्रनील नाईक हे शिवसेनेचा भगवा झेंडा हाती घेऊन निवडणूक रिंगणात उतरतील अशी शक्यता आहे. इंद्रनील हे सक्रिय राजकारणात नसले तरी त्यांचा पुसद मतदारसंघात प्रभाव आहे. त्यामुळे इंद्रनील यांनी शिवसेना किंवा भाजपात प्रवेश केला तर याठिकाणी राष्ट्रवादीला धक्का बसणार असल्याचं दिसत आहे.

COMMENTS