राष्ट्रवादीची दुसरी यादी जाहीर, भाजपमधून आलेल्या ‘या’ नेत्याला उमेदवारी!

राष्ट्रवादीची दुसरी यादी जाहीर, भाजपमधून आलेल्या ‘या’ नेत्याला उमेदवारी!

मुंबई – विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने काल उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. एकूण 77 उमेदवारांच्या या यादीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार, धनंजय मुंडे यांच्यासह बड्या नेत्यांची नावे आहेत. रोहीत पवार यांना कर्जत जामखेडमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर परळीतून धनंजय मुंडे, इंदापूरमधून दत्तात्रय भरणे, इस्लामपूरमधून जयंत पाटील या नेत्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर आज राष्ट्रवादीनं दुसरी यादी जाहीर केली आहे.

या दुसय्रा यादीत एकूण 20 उमेदवारांचा समावेश आहे. यामध्ये सोलापुरातील माढा मतदारसंघातून आमदार बबनदादा शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच माळशिरसमधून भाजप नेते उत्तमराव जानकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. जानकर हे गेली काही दिवसांपासून राष्ट्रवादीत येणार असल्याची चर्चा होती. त्यामुळे याठिकाणी भाजपनेही पहिल्या यादीत उमेदवार जाहीर केला नव्हता. भाजपकडून उमेदवारी मिळेल असा उत्तमराव जानकर यांना विश्वास होता. मात्र माळशिरस मतदारसंघावर मोहिते पाटील यांचे वर्चस्व असल्याने जानकर यांना तिकीट मिळण्यात अडथळे निर्माण होत असल्याची चर्चा होती. त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान गेली काही दिवसांपासून आमदार बबन शिंदे हे देखील भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा होती. परंतु बबन शिंदे हे राष्ट्रवादीतच राहिले. त्यामुळे त्यांना माढ्यातून उमेदवारी देण्यात आली आहे. लोकसभा निवडणूकीनंतर दोन्ही शिंदे बंधू राष्ट्रवादी काँग्रेसपासून अंतर ठेवून होते. राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानसभा निवडणुकीसाठी इच्छूक उमेदवारांच्या घेण्यात आलेल्या मुलाखतींमध्येही आमदार बबनदादा शिंदे गैरहजर होते. तेव्हापासूनच बबनदादा शिंदे हे भाजपमध्ये प्रवेश करतील, या चर्चेला उधाण आलं होतं. त्यानंतर त्यांनी सांगली-कोल्हापुरातील पूरग्रस्तांसाठी मदतनिधीचं निमित्त साधत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यामुळे ते दोन्ही नेते भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा होती. परंतु दोन्ही शिंदे बंधूंनी राष्ट्रवादीतच राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा माढातून उमेदवारी देण्यात आली आहे.

COMMENTS