आणखी एक मोठे घराणे शरद पवारांची साथ सोडण्याच्या तयारीत!

आणखी एक मोठे घराणे शरद पवारांची साथ सोडण्याच्या तयारीत!

यवतमाळ – राज्याला दोन मुख्यमंत्री देणारे आणि तब्बल 13 वर्ष मुख्यमंत्रीपद सांभाळणारे यवतमाळच्या पुसद येथील नाईक घराणे देखील शिवसेनेच्या वाटेवर असल्याची विश्‍वसनीय माहिती आहे. विदर्भातील राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेव आमदार, माजी मंत्री व ज्येष्ठ नेते मनोहर नाईक यांचे कनिष्ठ चिरंजीव इंद्रनील नाईक यांनी आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडणार असल्याचे स्पष्ट केले आहे, येत्या दोन दिवसात कुटुंबियांसोबत चर्चा करून पुढील निर्णय घेऊ असे सांगत त्यांनी आपल्याला भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांची ऑफर असल्याचा दावा केला आहे. याबाबत आज आमदार मनोहर नाईक यांच्या पुसद येथील बंगल्यावर समर्थक नेत्यांची बैठक सुरु आहे. या बैठकीत राष्ट्रवादी पक्ष सदस्यत्वाचे राजीनामे देण्याची तयारी पदाधिकाय्रांनी दर्शवली असल्याची माहिती आहे.

खरंतर पुसद मतदार संघ हा नाईकांचा गढ असून मनोहर नाईक यांचे पुतणे निलय नाईक हे याआधीच भाजपाच्या गळाला लागले आहेत, भाजपने त्यांना विधानपरिषद सदस्यत्व देखील बहाल केले, आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने हा मतदारसंघ युतीत शिवसेनेच्या वाट्याला असल्याने इंद्रनील नाईक हे शिवसेनेचा भगवा झेंडा हाती घेऊन निवडणूक रिंगणात उतरतील अशी शक्यता आहे. इंद्रनील हे सक्रिय राजकारणात नसले तरी त्यांचा पुसद मतदारसंघात प्रभाव आहे, मनोहर नाईक हे राष्ट्रवादी काँग्रेस सोडतील का? किंवा राजकारणातून निवृत्ती घेत पुत्र इंद्रनीलला साथ देतील का? हे देखील लवकरच स्पष्ट होणार आहे.

मनोहर नाईक यांची पत्नी अनिता नाईक या पुसदच्या नगराध्यक्ष असून त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव ययाती हे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष आहेत. जिल्ह्याच्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि सहकार क्षेत्रात नाईक घराण्याचा वरचष्मा आहे, हा मतदारसंघ बंजारा बहुल असून माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक हे बंजारा समाजासाठी दैवतासमान आहे. वसंतरावांचे पुतणे सुधाकर नाईक हे देखील राज्याचे मुख्यमंत्री होते ते शरद पवारांसोबत राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये शामिल झाले, वसंतराव नाईकांचे दुसरे पुतणे मनोहर नाईक यांनी आघाडी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रिपद सांभाळले, त्यांच्या रूपानेच विदर्भात राष्ट्रवादीचे अस्तित्व आहे. पुसद मध्ये आजवर नाईक घराण्या व्यतिरिक्त कोणीही निवडून आलेला नाही, आता नाईक घराणंच राष्ट्रवादीची साथ सोडत असल्याने आघाडी साठी हा मोठा धक्का असेल, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांना जोरदार हादरा देणारा नाईकांचा हा निर्णय असणार आहे.

COMMENTS