विधान परिषद निकाल विश्लेषण – व्यक्ती द्वेशानं पछाडलेल्या राष्ट्रवादीची खुमखुमी जिरली !

विधान परिषद निकाल विश्लेषण – व्यक्ती द्वेशानं पछाडलेल्या राष्ट्रवादीची खुमखुमी जिरली !

उस्मानाबाद – तेल गेलं, तूप गेलं हाती धुपाटणं आलं या म्हणी प्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसची विधान परिषद निवडणुकीतील स्थिती झाली. परभणी हिंगोली ही स्वतःकडे असलेली, विद्यमान आमदार असलेली जागा काँग्रेसला सोडली. गेल्या सहा महिन्यांपासून विद्यमान आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी तिथून जोरदार तयारी सुरू केली होती. त्यांचे दोन्ही काँग्रेससोबत तसे सलोख्याचे संबंध असतानाही ती जागा राष्ट्रादीने काँग्रेससाठी सोडली. आणि तुलनेत अवघड आणि गेली तीन टर्म तिथून काँग्रेसचा उमेदवार निवडूण येत असतानाही उस्मानाबाद-बीड-लातूर ही जागा स्वतःकडे घेतली. ते केवळ सुरेश धस यांना पराभूत करण्यासाठी. व्यक्तीद्वेश किती टोकाचा होता आणि त्याचा कसा फटका पक्षाला बसला हे निकालातून स्पष्ट झालं आहेच.

या मतदारसंघातून मतदान जास्त असूनही राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव का झाला याची चर्चा सध्या मतदारसंघात रंगली आहे. पराभवाच्या कारणांची आणि धस यांच्या विजयाच्या कारणांची चर्चा होत आहे. आर्थिक बळाच्या वापराचा विचार करता जगदाळे यांच्याकडेही मोठे आर्थिक बळ होते. तरीही मते भाजपच्या पारड्यात गेलीच कशी, असा प्रश्‍न उपस्थित होतो. उमेदवार निवडण्याचे सर्वाधिकारी धनंजय मुंडे यांना होते. त्यांनी प्रथम रमेश कराड यांना उमेदवारी जाहीर केली. कराड यांनी माघार घेताच पुरस्कृत म्हणून अशोक जगदाळे यांच्या पाठीशी बळ उभे केले. पण, धनंजय मुंडे यांचे पक्षातील वर्चस्व तिन्ही जिल्ह्यातील नेत्यांना डोईजड वाटत असावे. त्यामुळे मुंडे यांच्या खच्चीकरणाची संधी कशी सोडायची, याच विचारातून मुंडे यांचा उमेदवार पराभूत करण्यासाठी काँग्रेससह राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही सहकार्य केल्याची चर्चा आहे.

दुसरीकडे उस्मानाबाद जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या एका बड्या नेत्याला जगदाळे यांचा यांचा उदय नको होता अशीची चर्चा आहे. हीच उमेदवारी त्या बड्या नेत्याच्या घरातील एखाद्या व्यक्तीला मिळाली असती तर त्यासाठी अहोरात्र झटले असते. रात्रीचा दिवस केला असता. स्वतः तिन्ही जिल्हे फिरून पिंजून काढले असते. पण, जगदाळेंच्या प्रचारासाठी लाल दिव्याचा सोबती देऊन अंग काढून घेतल्याची चर्चा आहे. एक तर जिल्ह्यात प्रतिस्पर्धी निर्माण होऊ नये, तर दुसरे म्हणजे मुंडे यांच्या वाढत्या वर्चस्वाला लगाम, यामुळे जगदाळेंना परभाव पदरी आला. यातून जगदाळे हरले म्हणण्यापेक्षा राष्ट्रवादीतील मुंडे हरल्याचा आनंद अनेकांना झाल्याचं बोलले जाते.

भाजप शिवसेना युतीपेक्षा आघाडीचे संख्याबळ १०० ते १२५ मतांनी जास्त होते. तरीही धस ७६ मतांनी निवडूण आले. यामध्ये काँग्रेसची मते तर फुटलीच शिवाय राष्ट्रवादीची मतेही फुटली हे नाकारून चालणार नाही. तुळजापूर, बीड पालिकेतील राष्ट्रवादीची मते फोडण्यात धस यांना यश आले. येथेच धस यांचा विजय निश्‍चित झाला होता. राजकारणात टोकाचा व्यक्तीद्वेश चांगला नाही. तसंच एकाच वेळी अनेक शस्त्रू निर्माण करणंही धोक्याचं असतं याची प्रचिती राष्ट्रवादीच्या नेत्यांना आली असेल. या पराभवातून राष्ट्रवादीचे नेते आता काय धडा घेतात ते पहावं लागेल.

COMMENTS