राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक, मुंबईतील कार्यालयाबाहेर घोषणाबाजी! VIDEO

राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक, मुंबईतील कार्यालयाबाहेर घोषणाबाजी! VIDEO

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून राज्यात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. मुंबईतील राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेरही कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरु केली आहे. ठाण्यातील पाचपाखडी परिसरातील राष्ट्रवादीच्या कार्यालयाच्या बाहेर जमलेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. राष्ट्रवादीचे ठाणे अध्यक्ष आनंद परांजपे यांच्यासहित अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज ईडीच्या कार्यालयात जाणार आहेत. मात्र शरद पवार यांची जेव्हा चौकशी करायची असेल तेव्हा त्यांना समन्स बजावण्यात येईल. त्यामुळे जोपर्यंत चौकशीसाठी बोलावण्यात येत नाही तोपर्यंत येऊ नये, अशी विनंती ईडीने शरद पवार यांना केल्याची माहिती आहे.शरद पवार मात्र ईडी कार्यालयात जाण्याबाबत ठाम आहेत. त्यामुळे दुपारी 2 वाजता ते ईडीच्या कार्यालयात जातील. या पार्श्वभूमीवर फोर्ट परिसरात 144 कलम लागू करण्यात आलं आहे. शरद पवारांवर गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर ईडी कार्यालयासमोर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला होता. त्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया

दरम्यान यावर छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली असून धरपकड हाेणार या हेतूनेच कार्यकर्ते मुंबईत आले आहेत. जर ईडीला बाेलवायचं नव्हतं, तर मग नावं लिक का केली असा सवाल भुजबळ यांनी केला आहे. साहेब आपलं म्हणणं मांडण्यासाठी ईडीमध्ये जाणार आहेत असंही त्यांनी म्हटलं आहे.

जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया

काँग्रेस नेते राहूल गांधींनी देखील शरद पवारांच्या समर्थनार्थ ट्विट केलं आहे. त्यांचं मी स्वागत करताे. खरंच हे सुडाचे राजकारण सुरू आहे. एकनाथ खडसे, संजय राऊत, अण्णा हजारे यांनीही पवारांचे समर्थन केले आहे. यावरूनच त्यांचे निर्दाेषत्व समाेर येते असं आव्हाड यांनी म्हटलं आहे.

काय म्हणालेत राहुल गांधी ?

राहुल गांधी यांनी शरद पवारांविरोधात होत असलेल्या कारवाईवरुन टीका केली आहे. “भाजपाकडून सूडभावनेने लक्ष्य केलेले शरद पवार आणखी एक विरोधी पक्षनेते आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या एक महिना आधी कारवाई केली जात आहे. सरकारच्या सूडभावनेचा निषेध असल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

COMMENTS