राहुल गांधी राजीनाम्यावर ठाम, काँग्रेस अध्यक्षपदासाठी राज्यातील ‘या’ नेत्याचं नाव चर्चेत !

राहुल गांधी राजीनाम्यावर ठाम, काँग्रेस अध्यक्षपदासाठी राज्यातील ‘या’ नेत्याचं नाव चर्चेत !

नवी दिल्ली -काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पक्षाध्यक्षपद सोडण्याच्या भूमिकेवर अजूनही ठाम असल्याचे मानले जात आहे.काँग्रेस कार्यकारिणी बैठकीत पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा प्रस्ताव मांडून दोन दिवस झाल्यानंतरही राहुल गांधी यांनी कोणतेही निवेदन जारी केलेले नाही. राहुल यांनी शनिवारनंतर कोणत्याही राजकीय कार्यक्रमास हजेरी लावलेली नाही. तसेच ते काँग्रेसच्या नव्या खासदारांनादेखील भेटलेले नाहीत.  गांधी घराण्याशिवाय अध्यक्ष सुचवा असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारून काँग्रेसच्या काही राज्यांतील प्रदेशाध्यक्षांनी राजीनाम्याची तयारी दाखवली आहे. पंजाबचे सुनील जाखड, झारखंडचे अजोय कुमार आणि आसामचे रिपुण बोहरा, महाराष्ट्राचे अशोक चव्हाण यांचा त्यात समावेश आहे.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला फक्त ५२ जागा मिळाल्या आहेत.त्यामुळे काँग्रेस नेत्यांनी पक्षापेक्षा स्वत:च्या कुटुंबाचे हित जपल्याचा आरोपही राहुल गांधी यांनी केला होता. कार्यकारिणीमधील बहुतांश सदस्यांना लोकसभेच्या निवडणुकीत हार पत्करावी लागली आहे. त्यामुळे पक्षाध्यक्ष पदाची धुरा कोणाकडे द्यायची हा प्रश्न निर्माण झालेला आहे.प्रियंका गांधी-वड्रा यांच्या नावावर राहुल गांधी यांनीच फुली मारली असून गांधी घराण्यातील व्यक्ती काँग्रेसच्या अध्यक्षपदी नको, असे राहुल यांचे म्हणणे आहे.

दरम्यान राहुल गांधी यांच्या या निर्णयामुळे आता काँग्रेसचा नवा अध्यक्ष कोण असणार याबाबत चर्चा रंगली आहे. अध्यक्षपदासाठी महाराष्ट्रातून काँग्रेस नेते आणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव चर्चेत असल्याची माहिती आहे. त्याचबरोबर काँग्रेस अध्यक्षपदासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ए. के. अँटेनी, राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्याही नावाचा समावेश आहे. दरम्यान, काँग्रेस वर्किंग कमिटीने पक्षांतर्गत बदलासाठी राहुल गांधींना पूर्ण अधिकार दिले आहेत. त्यामुळे लवकरच काँग्रेसच्या अध्यक्षपदावर नवीन नेता विराजमान होणार असल्याचं दिसत आहे.

COMMENTS