“मुलाला भाजपमध्ये पाठवून गणेश नाईकांनी त्याचा बळी दिला!”

“मुलाला भाजपमध्ये पाठवून गणेश नाईकांनी त्याचा बळी दिला!”

मुंबई – नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे राष्ट्रवादीचा युवक मेळावा पार पडला. या मेळाव्यात राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या गणेश नाईकांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार टीका केली. राजकीय महत्वाकांक्षेपोटी गणेश नाईकांनी मुलाला भाजपमध्ये पाठवून त्याचा बळी दिल्याची जहरी टीका आव्हाड यांनी केली आहे. काही लोकांचे नाशीब आहे, ते शिवसेनेकडे गेले आणि त्यानंतर पवारांकडे आले. सत्तेसाठी काय काय करायचे हे नाईकांना माहीत आहे. गणेश नाईक कोणीही नाही, ते स्वतःचे खिशे भरण्यासाठी लढले असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.

दरम्यान यावेळी राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार यांनीही नाईक यांच्यावर जोरदार टीका केली. नवी मुंबईत दोन नेते आहेत. मात्र, आता त्यांची ताकद राहिलेली नाही.एक व्यक्ती गेल्याने काहीही होत नाही. केंद्राचे राजकारण वेगळे असते हे लोकांना माहिती आहे. पण, विधानसभेला पवार साहेबांना सोडले, पक्ष सोडून गेले. परंतु पक्ष हा कुठल्या नेत्यामुळे असतो, असं नाही. पक्ष हा कार्यकर्त्यांमुळे असतो असंही यावेळी रोहित पवार म्हणाले.

तसेच युवक ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद आहे आणि याच युवा शक्तीच्या जोरावर आपण राज्यात परिवर्तन घडवून दाखवलं आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपण सत्तेवर आहोत. या सत्तेचा वापर सर्वसामान्य लोकांची कामं करण्यासाठी आणि सरकारच्या विविध योजना समाजातील शेवटच्या स्तरापर्यंत कशा पोचतील यासाठी प्रयत्न करा, असं आवाहन यावेळी रोहित पवारांनी केलं.

राज्यात आपलं सरकार असलं तरी महापालिकेतही आपल्या विचारांची सत्ता असेल तर खरा विकास करता येतो. त्यामुळे गटातटाला थारा न देता आणि एकमेकांमधील हेवेदावे विसरुन इथल्या आर्थिक बलाढ्य शक्तीला हरवण्यासाठी आणि महापालिकेतही लोकांच्या विचारांची सत्ता आणण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करा असंरी रोहित पवार म्हणाले.

यावेळी जिल्हाध्यक्ष अशोक गावडे, महिला जिल्हाध्यक्ष सौ. रोहिणी घाडगे, आयोजक तेजस शिंदे, मोहन पाडळे, पंकज वाडकर, प्रदेश सरचिटणीस प्रशांत जी पाटील, ओबीसी सेल चे प्रदेश सरचिटणीस राज राजापूरकर, युवकचे जिल्हाध्यक्ष नितीन चव्हाण, युवती जिल्हाध्यक्ष श्वेताताई खरात, महिला कार्याध्यक्ष सौ. विजया कदम यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने या मेळाव्याला उपस्थित होते.

COMMENTS