July 10, 2010

साहित्य महामंडळाच्या घटनेत बदल करण्यास समितीची नेमणूक

विश्‍व मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्‍वभूमीवर घटनेत बदल केले जाणार असल्याने साहित्य महामंडळाच्या घटनेत बदल करण्यासाठी महामंडळाच्याच पदाधिका-यांची एक समिती स्थापन करण्याचा निर्णय मुंबई येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

साहित्य महामंडळाचे औरंगाबाद येथील कार्यालय आता मुंबईला स्थलांतरीत झाल्यानंतर महामंडळाच्या पदाधिका-यांची पहिलीच बैठक 7 मे रोजी मुंबई मराठी साहित्य संघाच्या कार्यालयात झाली. महामंडळाच्या नवनिर्वाचीत अध्यक्षा प्रा. उषा तांबे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होत्या.

साहित्य महामंडळातर्फे यापूर्वी दोन विश्‍व मराठी साहित्य संमेलने घेण्यात आली. या
संमेलनाच्या आयोजनासाठी काही घटना, नियम असावेत अशा काही जणांच्या सूचना
होत्या. त्यानुसार घटनेत बदल करून विश्‍व मराठी साहित्य संमेलनाला पुरक असे नियम तयार करण्याचे ठरविण्यात आले. या समितीमध्ये प्रा.उषा तांबे, उज्ज्वला मेहंदळे, गुरूनाथ दळवी, कपूर वासनिक, प्राचार्य कौतिकराव ठालेपाटील,वि.भा.देशपांडे, सुरेश नाईक व नागपूरच्या एका प्रतिनिधीचा समावेश
करण्यात आला आहे. येत्या तीन महिन्यात घटनेत दुरूस्ती करण्यात येईल असे
अतकरे म्हणाले. यंदा विश्‍व मराठी साहित्य संमेलनासाठी महामंडळाकडे लंडन
येथून निमंत्रण आले आहे.

84 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी साहित्य महामंडळाकडे बेळगाव, ठाणे व पिंप्री चिंचवड येथून निमंत्रण प्राप्त झाले आहे. साहित्य संमेलनाचे स्थळ कोणते असावे हे ठरविण्यासाठी स्थळ निवड समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीमध्ये प्रा.उषा तांबे, उज्ज्वला मेहंदळे, गुरूनाथ दळवी, कपूर वासनिक, डॉ.दादा गोरे, माधवी वैद्य, मनोहर म्हैसाळकर यांचा समावेश करण्यात आला आहे. ही समिती येत्या काही महिन्यात साहित्य संमेलनाचे स्थळ निश्‍चीत करतील.

( टीप: तुम्हाला वरील मजकुरात काही दुरुस्ती सूचवायची असेल, काही माहितीची भर घालावीशी वाटत असेल किंवा हा मजकूर अयोग्य असल्याने काढून टाकावा असं वाटत असेल, तर कृपया आम्हाला contact@mahapolitics.com वर संपर्क साधा.)