ठाणे शहर भाजप अध्यक्षपदी आमदार निरंजन डावखरेंची बिनविरोध निवड!

ठाणे शहर भाजप अध्यक्षपदी आमदार निरंजन डावखरेंची बिनविरोध निवड!

ठाणे – ठाणे शहर जिल्हा भाजप अध्यक्षपदी कोकण पदवीधर मतदारसंघातील आमदार निरंजन डावखरे यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीद्वारे भाजपने तरुण व स्वच्छ प्रतिमेच्या चेहऱ्याला पसंती दिली असल्याचे मानले जात आहे. भाजपच्या शहराध्यक्षपदासाठी आमदार निरंजन डावखरे यांच्याविरोधात कोणत्याही कार्यकर्त्याने अर्ज दाखल न केल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली. भाजपचे कोकण प्रभारी व निवडणूक अधिकारी रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते निरंजन डावखरे यांना अध्यक्षपदाचे पत्र देण्यात आले. या वेळी आमदार संजय केळकर, मावळते शहराध्यक्ष संदीप लेले, ज्येष्ठ नगरसेवक अशोक राऊळ, मनोहर डुंबरे, मुकेश मोकाशी, सुनेश जोशी, महापालिकेतील नगरसेविका आदींसह भाजपचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

निरंजन डावखरे यांच्या निवडीने
चैतन्यमय वातावरण निर्माण झाले असून, ठाणे शहर शत:प्रतिशत भाजप होईल, असा विश्वास कोकण प्रभारी रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला. डावखरे कुटुंबाच्या ठाण्यात अनेक पिढ्या गेल्या असून शहराशी एकरूप झालेले हे कुटुंब आहे. निरंजन डावखरे यांची निवड योग्य वेळी झाली आहे. आगामी काळात पक्षासमोर अनेक आव्हाने असून त्यात निरंजन नक्कीच यशस्वी होतील. ठाण्यात आपण शत:प्रतिशत भाजप निश्चितच करू, अशी ग्वाही आमदार संजय केळकर यांनी दिली.

मी स्वतः निरंजन डावखरे यांचे नाव अध्यक्षपदासाठी सुचविले. ते माझ्याहून चांगली कामगिरी करतील, असा विश्वास मावळते शहराध्यक्ष संदीप लेले यांनी व्यक्त केला. नवनिर्वाचित अध्यक्ष निरंजन डावखरे यांना तीन वर्षांचा कालावधी मिळणार आहे. त्यामुळे २०२२ मध्ये होणाऱ्या महापालिका निवडणुका त्यांच्याच नेतृत्वाखाली लढविल्या जाणार आहेत. आमदार निरंजन डावखरे यांची प्रतिमा स्वच्छ असून, ते तरुण आहेत. त्यांनी बी. कॉम. व एल. एल. बी. पर्यंत शिक्षण घेतले आहे. विधीमंडळाच्या विशेषाधिकार, आश्वासन आणि आदिवासी समितीबरोबरच ते डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य आहेत. त्यांचा ठाणे शहरात चांगला संपर्क आहे. त्याचा फायदा भाजपला होण्यासाठी अध्यक्षपदासाठी त्यांची बिनविरोध निवड झाली असल्याचे मानले जाते.

आमदार निरंजन डावखरे यांच्याकडून कोकण पदवीधर मतदारसंघाचे २०१२ पासून प्रतिनिधीत्व केले जात आहे. या काळात त्यांनी ठाणे शहरासह कोकणातील विविध प्रश्न मार्गी लावले आहेत. त्याचबरोबर शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, सुशिक्षित बेरोजगारांसाठी रोजगार मेळावे घेण्याबरोबरच ठाणे शहरातील नागरी समस्यांना वाचा फोडली आहे. कोकणातील प्रत्येक शाळेत आधुनिक व डिजीटल शिक्षणाचा त्यांनी ध्यास घेतला आहे.

COMMENTS