नितीशकुमारांना काँग्रेसची ऑफर, महाआघाडीत सामील होणार ?

नितीशकुमारांना काँग्रेसची ऑफर, महाआघाडीत सामील होणार ?

नवी दिल्ली – बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना काँग्रेसनं ऑफर दिली आहे. त्यामुळे नितीशकुमार हे महाआघाडीत सामील होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. काँग्रेसने नितीशकुमार यांच्यापुढे एक नवा प्रस्ताव ठेवला असून त्यानुसार नितीशकुमार यांनी भाजपची साथ सोडण्याची तयारी दर्शवली तर त्यांना महाआघाडीत सामील करून घेण्यावर विचार केला जाऊ शकतो, असा प्रस्ताव काँग्रेसनं त्यांच्यासमोर ठेवला आहे. बिहारमधील काँग्रेसचे प्रभारी शक्तिसिंह गोहिल यांनी याबाबतचा प्रस्ताव ठेवला असल्याची माहिती आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वीच झालेल्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीमध्ये जेडीयू आणि भाजपमध्ये परस्परविरोधी वक्तव्ये समोर आली होती. त्यामुळे नेमकी हीच संधी साधून  काँग्रेसने नितीशकुमार यांच्यापुढे महाआघाडीत येण्याची ऑफर ठेवली आहे. तसेच शक्तिसिंह गोहिल यांनी रामविलास पासवान आणि उपेंद्र कुशवाहा यांचा उल्लेख करत, केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार मागास व अतिमागास वर्गाच्या विरोधात असल्याची राज्यात लोकभावना आहे. त्यामुळे भाजपची साथ सोडण्याखेरीज या वर्गांपुढे दुसरा पर्याय नसल्याचं गोहिल यांनी म्हटलं आहे. तसेच नितीशकुमार यांना महाआघाडीत यायचे असेल तर या मुद्दय़ावर आम्ही आमच्या सहकारी पक्षांशी नक्कीच चर्चा करू. मागास जातींचे राजकारण करणा-या एनडीएमधून बाहेर पडावेच लागेल. तसे केले नाही तर एनडीए तर बुडेलच परंतु यासोबततच इतर पक्षही बुडतील असंही गोहिल यांनी म्हटलं आहे.

दरम्यान भाजपविरोधात राष्ट्रीय पातळीवर होणा-या महाआघाडीचे नेतृत्व काँग्रेसकडे असणार असून नितीशकुमार यांना महाआघाडीत घेण्याबाबत गोहिल यांनी सकारात्मक संकेत दिले आहेत. त्यामुळे महाआघाडीत बिहारचे मुख्यमंत्री असलेले नितीशकुमार हे सामील होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

COMMENTS